
शक्य तरी आहे का हे? परीक्षेशी आणि फ्रेंडशिप? परीक्षा नकोशी वाटते. तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? आपल्याला अजून अशा अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्या प्रत्येक वेळेला हेच करून बघ. आपण वर्षभर अभ्यास करतोच. धडे वाचणं, प्रश्नोत्तरं वाचणं, गणितं सोडवणं, लेखनाचा सराव करणं – हे तर असतंच. पण या केलेल्या मेहनतीचं योग्य फळही तुला मिळायलाच हवं. यासाठी खाली सुचवलेल्या गोष्टी नक्की करून बघ.
शत्रूंना नो एन्ट्री
कधी आळस, कधी कंटाळा, भीती, अतिशय ताण, न आवरता येणारी झोप – हे सध्या तरी आपले शत्रूच आहेत. त्यांना लांब ठेवू शकलो, तर फारच भारी काम होईल.
चित्रातून अभ्यास कर
वही विज्ञानाची असू दे, भूगोलाची किंवा इतिहासाची; अभ्यास म्हणजे फक्त विविध प्रश्नांची उत्तरं असतात. आता या उत्तरांजवळच्या समासात तुझ्या लक्षात राहील असं लहानसं चित्रही काढ. ही चित्र त्या त्या उत्तरांशी संबंधित असायला हवीत. आकृतीच्या स्वरूपात असावीत. प्रश्नाचं उत्तर आठवायच्या वेळेला ही चित्र आठवतील. किंवा आधी हे चित्र आठवेल आणि मग उत्तर आठवेल. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये चित्रंही असतात. काही ठिकाणी, नीट समजावं म्हणून आकृत्या असतात. या आकृत्या नीट बघ. लक्षात ठेव.
यातलं काहीही शक्य नसेल तर महत्त्वाच्या वाक्यांच्या खाली रंगीत पेन्सिलीने / स्केचपेनने खुणा कर. यातून मेंदूतल्या रंगपेशींना पेशींना काम मिळतं. त्यामुळे लक्षात राहतं.
वेळेवर झोप आणि वेळेवर ऊठ!
आपली रोजची कामं मस्त चांगल्या मूडमध्ये पार पडण्यासाठी रात्रीची शांत झोप खूपच आवश्यक असते. त्यामुळे दिवसा उगाचच झोपू नका. त्या ऐवजी रात्री वेळेवर झोपा. रात्रीची झोप स्मरणशक्तीसाठी खूपच चांगली असते.
आपल्या सध्याच्या परीक्षा पद्धतीत काही गोष्टी पाठांतरासाठीच्याच असतात. ज्या व्याख्या, सूत्रं, कविता, श्लोक, आकृत्या लक्षात ठेवायच्या असतील, त्यातलं रोज एक याप्रमाणे एका कागदावर स्वत: लिही. रात्री झोपताना वाच. सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा वाच. याशिवाय दोन तीन दिवसांनी पुन्हा लक्षात आहे ना हे बघ.
आपण अनेकदा रात्री जागतो. पण हे जागरण एकूण शरीरावर; त्यातही स्मरणशक्तीवर चुकीचा परिणाम करतं. म्हणून रात्रीच्या शांत झोपेकडे नीट लक्ष द्या.
मेंदूला खायला दे!
कंटाळा घालवण्यासाठी चमचमीत खायची इच्छा होते. पण सध्या आपल्याला चांगलं खायचं आहे! मेंदू सतत, चांगल्या प्रकारे, पूर्ण कार्यक्षमेने चालायला हवा असेल तर त्याला चांगलं खायला द्यायला पाहिजे. मेंदूला ग्लुकोजची अत्यंत आणि सातत्याने गरज असते. हे ग्लुकोज रक्तप्रवाहातून शोषलं जातं. यासाठी ठरावीक वेळेला आणि नियमित योग्य प्रकारचा आहार घेणं हे खूपच आवश्यक आहे.
ऑक्सिजनही दे!
नुसतंच एकाजागी बसून मेंदू मंद होतो. त्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची हालचाल केल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे नियमित व्यायाम करायलाच हवा. यात चालणं, पळणं हे व्हायला हवं. एरोबिक्स प्रकारातले व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारचा नाच हा उत्तम व्यायामच असतो. एकदम ताजंतवानं वाटतं.
आपण वर्गात, क्लासमध्ये किंवा अभ्यास करताना सतत बसून असतो. टी.व्ही., कॉम्प्युटर आपल्याला बसवून ठेवतो. अशा प्रकारे सतत बसून राहिल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नाही. म्हणून अधूनमधून चाल, फिर, उड्या मार, नाच. यातून मेंदू तरतरीत होईल.
नो टेन्शन प्लीज
या काळात कधीकधी भावनेचा भर येतो आणि आपण त्या भावनेच्या भरात वाहून जायला लागतो. उदा. परीक्षेच्या काळातली भीतीची भावना. परीक्षेच्या ताणाची छोटीशी भावना आपल्या मनात असते. ती आवश्यकही असते. तो चांगला ताण असतो. ताण असावा; पण तो कमी प्रमाणात असावा. त्यामुळे आपला अभ्यास चांगला होतो. परीक्षेला निघताना या ताणात भीती + चिंता + वाया घालवलेल्या वेळामुळे आलेली अपराधाची भावना + त्यातून मित्रमैत्रिणींनी आपल्याला दिलेली भीती, त्यांची टेन्शन्स या सगळ्यामुळे भीतीचा हा पूर वाढत जाण्याची शक्यता असते. याचा परिणाम स्वत:वर होणं मात्र योग्य नाही. या सर्व गोष्टी आपल्या बाबतीत होऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आणि फक्त हातातल्या पेपरवर लक्ष केंद्रित करायचं .
हे माझ्या लक्षात राहील! नक्कीच!
कितीही म्हटलं तरी परीक्षेचा विषय येतो तेव्हा स्मरणशक्तीला ताण द्यावाच लागतो. या स्मरणशक्तीने साथ द्यावी म्हणून एक करून बघ. ‘मी कितीही अभ्यास केला आणि कितीही पाठ केलं तरी माझ्या लक्षातच राहात नाही’ असं म्हणण्याची सवय खूप जणांना असते. ही सवयच घातक आहे. या सवयीमुळेच केलेला अभ्यास लक्षात राहत नाही.
त्याऐवजी धडा वाचताना नुसतीच शब्दांवरून नजर फिरवू नका. वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आणि अधूनमधून मेंदूला हे ठणकावून सांगा की, ‘…. हे माझ्या नक्की लक्षात राहील’ असं म्हणत राहा.
अभ्यास झाला आहे, यावर विश्वास
आपला मेंदू फार प्रॅक्टिकल असतो. आपण जे सांगू त्याप्रमाणेच तो वागतो. फक्त हे आपल्याला माहीत नसतं. आता स्वत:च्या मेंदूला सांग की, आसपास काहीही घडलं तरी – माझा अभ्यास झालेला आहे, तो मी परीक्षेत जाऊन लिहिणार आहे.
डॉ. श्रुती पानसे