ओरिसा राज्यातील कटक येथे एकशे तेवीस वर्षांपूर्वी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. नसानसांत देशप्रेम भरलेल्या नेताजींनी विद्यार्थिदशेपासूनच इंग्रज सत्तेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. पूर्णवेळ देशसेवा हाच त्यांचा ध्यास होता, परंतु त्यांचा जवळचा मित्र हेमंतकुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी आय.सी.एस.ची परीक्षा द्यायची असे ठरवले. त्याला कारणही तसेच होते. इंग्रज अधिकारी तुच्छतेने असे म्हणत की, ‘भारतीय तरुण आयसीएसची परीक्षा पास होऊ शकत नाहीत, कारण ते मंदबुद्धीचे आहेत.’
इंग्रजांचा हा भ्रम मोडण्यासाठी नेताजींनी आय.सी.एस. परीक्षा पास करूनच दाखवायची असे ठरवले. सर्वोत्तम गुण प्राप्त करून आयसीएस होण्यासाठी नेताजी इंग्लंडला गेले. तिथे असताना त्यांनी लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकले. लोकमान्य म्हणाले, "इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी सरकारी नोकरीत न शिरता साधी राहणी ठेवून आपल्या देशाची सेवा करावी; तुमच्यासारख्या उच्चविद्याविभूषित तरुणांची आज आपल्या मातृभूमीला गरज आहे....’’
या भाषणाचा नेताजींच्या मनावर फार प्रभाव पडला. नेताजी सुभाषचंद्र बोस आय.सी.एस. परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, तरी त्यांना इंग्रजांची चाकरी करणे पसंत नव्हते. तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड माँटिग्यू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहिले होते - 'मी आय.सी.एस. झालो असलो तरी एकाच वेळी ब्रिटिश सरकारची व माझ्या देशाची सेवा करता येणे मला अशक्य आहे, म्हणून मी हा राजीनामा पाठवला आहे. यापुढे मी राष्ट्रीय लढ्यात सक्रिय भाग घेणार आहे.'
आपल्या निर्धाराप्रमाणेच नेताजींनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही झाले. पुढे त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा क्रांतिकारी विचारांचा पक्ष काढला. हा पक्ष काढल्यानंतर ते इंग्रजांच्या नजरकैदेत होते. आजारपणाचे सोंग घेऊन पठाणी वेष घालून, जियाउद्दीन पठाण असे नाव धारण करून ते नजरकैदेतून सटकले, ते सरळ पेशावरला गेले. तिथून काबूल मार्गे ते जर्मनीत बर्लिनला पोहोचले. २८ मार्च १९४१ रोजी त्यांनी बर्लिन रेडिओवरून भारतीय लोकांना उद्देशून स्वातंत्र्यलढ्याचे आव्हान केले. याच भाषणात त्यांनी, ‘तुम मुझे खून दो... मैं तुम्हें आजादी दूंगा’ हा जयघोष प्रेरकमंत्र म्हणून दिला. पुढे त्यांनी आझाद हिंद फौज उभारली. या फौजेत महिलांनाही सामावून घेतले. त्यासाठी 'झाशी राणी लक्ष्मी' नावाची स्वतंत्र फलटण त्यांनी उभारली.
१९४३च्या ऑक्टोबर महिन्यात सुभाषबाबूंनी सिंगापूरला ‘आझाद हिंद सरकार’ची स्थापना केली. अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे तिरंगा फडकवला. अंदमानला 'शहीद बेट' व निकोबारला ‘स्वराज्य बेट’ अशी नावे दिली. तिरंगा ध्वज हे आझाद हिंद सेनेचे निशाण होते. ‘जय हिंद’ हे अभिवादनाचे शब्द, तर ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्य होते. ‘कदम कदम बढाये जा...’ हे समरगीत आझाद हिंद संघटनेमध्ये म्हटले जायचे. कोणत्याही परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे या देशप्रेमाच्या विचारांचा यज्ञकुंड त्यांनी भारतभर प्रज्वलित केला.
टोकियोच्या विमान प्रवासात आकाशातच विमानाचा स्फोट झाल्याने सर्वांग भाजलेल्या अवस्थेत सुभाषचंद्र बोस यांना फोमोसाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचा दुःखद अंत झाला. एक धगधगता देशभक्तीचा यज्ञकुंड शांत झाला.
‘इंडियन स्ट्रगल’ नावाचे त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर लिहिलेले पुस्तक उपलब्ध आहे. १९९२ला भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला, परंतु बोस कुटुंबीयांनी काही कारणास्तव तो सन्मान स्वीकारण्यास नकार दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने आज विमानतळ आहे, तर वेगवेगळ्या नगरांमध्ये रस्त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. कलकत्त्यामध्ये नेताजींच्या नावावर एक स्वतंत्र संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्यांच्या राहत्या घरीसुद्धा संग्रहालय तयार करण्यात आले आहे. गेल्याच वर्षी भारताचा अभिमान असणाऱ्या लाल किल्ल्यातदेखील नेताजींचे स्मारक असणारे एक भव्य दालन उभारण्यात आले आहे. या दालनात नेताजी वापरत असलेली खुर्ची, त्यांचे टेबल, त्यांचे कपडे, वस्तू, त्यांना मिळालेली विविध मेडल्स ठेवण्यात आली आहेत.
नेताजींनी अंदमानच्या बेटावरील हॅलोक बेट, नीलबेट, रासबेट यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता, त्या बेटांचे आता ‘स्वराज बेट’, ‘शहीद बेट’ आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बेट’ म्हणून नामकरण करण्यात आले आहे. या बेटांना नेताजींचे नाव देऊन नेताजींप्रती कृतज्ञताच व्यक्त करण्यात आली आहेत.
असीम त्याग, धैर्य, धाडस आणि संघटन शक्ती असणाऱ्या भारतमातेच्या या थोर सुपुत्राला कोणीच विसरू शकणार नाही, एवढे त्यांचे योगदान मोठे आहे. भारतमातेच्या या सच्च्या सुपुत्राला शतशः नमन!
-नरेंद्र लांजेवार
***