Menu

अतिथिदेवो भव !

image By Wayam Magazine 25 January 2024

पर्यटनविषयक अनेक जाहिरातींमध्ये तुम्ही ‘अतिथिदेवो भव’ हे बोधवाक्य पाहिले, ऐकले असेल. आपला देश विविधतेने नटलेला आहे. इथली भौगोलिक, सांस्कृतिक विविधता जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. त्यातून कित्येकांना रोजगार मिळतो. यात वाढ व्हावी या उद्देशाने भारताच्या पर्यटन मंत्रालयाने २००२ सालापासून पर्यटनाच्या विकासासाठी ‘अतुल्य भारत (Incredible India)’ या नावाने एक मोहीम सुरू केली. या मोहिमेचे घोषवाक्य म्हणून ‘अतिथिदेवो भव’ हे वचन निवडण्यात आले आहे. 

संस्कृत भाषेत संधी आणि समास यांचा खूप उपयोग आढळतो. या वैशिष्ट्यामुळेच ती अल्पाक्षररमणीय म्हणजेच कमी शब्दांत बराच अर्थ सुंदररीत्या व्यक्त करणारी भाषा आहे. 

अतिथिदेवो भव = अतिथिदेवः + भव। अतिथिदेव हा बहुव्रीहि समास आहे, ज्याचा अर्थ आहे अतिथीला देव मानणारा. भव म्हणजे ‘हो’. हे आज्ञार्थी क्रियापद अनेक आशीर्वादांमध्ये येते. उदाहरणार्थ, आयुष्मान् भव, यशस्वी भव, इत्यादी. म्हणून ‘अतिथिदेवो भव’ या वाक्याचा अर्थ होतो, अतिथीला देवासमान मानणारा हो - Be the one for whom the guest is God. हे वचन ‘अतिथिदेवो भव’ असेच लिहिले पाहिजे. अनेक ठिकाणी ते ‘अतिथी देवो भवः’ किंवा इंग्लिशमध्ये ‘Atithi devo bhavah’ असे चुकीचे लिहिलेले दिसते. 

मागील लेखांमध्ये उपनिषदे या संस्कृत ग्रंथांचा उल्लेख तुम्ही वाचलाच आहे. उपनिषदांच्या काळात विद्यार्थी गुरूच्या घरी शिक्षणासाठी राहत असत. शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक काळात विद्यापीठे पदवीदान समारंभ (Convocation Ceremony) आयोजित करतात. तसाच ‘समावर्तन समारंभ’ म्हणजे गुरुगृही अध्ययन पूर्ण करून स्वतःच्या घरी जाणाऱ्या शिष्यांसाठी तेव्हा होत असे. तैत्तिरीय उपनिषदातील ‘शिक्षावल्ली’ या प्रकरणात अशाच प्रसंगी विद्यार्थ्याला केलेला उपदेश आहे. तेथे गुरू शिष्याला सांगतात, “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव।” म्हणजेच मातेला, पित्याला, गुरुजींना व घरी आलेल्या पाहुण्याला देवासमान मानणारा हो. 

किती सुंदर संदेश आहे हा! संस्कृत भाषेत ‘अतिथि’ याचा अर्थ ज्याची येण्याची तिथी (दिवस) निश्चित नसते, तो अचानक येणारा पाहुणा. आपण एखाद्या समारंभासाठी मुद्दाम निमंत्रित केलेल्या पाहुण्याला अतिथी म्हणतो ते खरे बरोबर नाही, त्याला अभ्यागत म्हटले पाहिजे. (‘आज येथे आलेल्या अतिथींचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया’ असा उल्लेख निवेदनात केला जातो, ते चुकीचे आहे.) खास बोलावलेल्या पाहुण्याचा सन्मान आपण करतोच, पण अचानक आलेल्या पाहुण्याचाही आदरसत्कार करावा, असे या बोधवाक्यात सांगितले आहे. 

पर्यटक हेही अतिथीच असतात. पर्यटन व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हर, मार्गदर्शक, दुकानदार या सर्वांनी त्यांच्याशी आदराने वागले पाहिजे. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा त्यांना आपल्या गावात, शहरात मदत केली पाहिजे, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आपल्या देशाची प्रतिमा त्यामुळे उंचावेल. आपल्या सौजन्यामुळे प्रभावित झालेले पर्यटकच मग देशाची प्रसिद्धी करतील.  

 'केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार॥' हे वचन तुम्ही ऐकले असेल. हल्ली ‘देशाटन’ऐवजी ‘पर्यटन’ हा शब्द जास्त वापरला जातो. हे शब्द आहेत देश + अटन आणि परि + अटन असे. ‘अटन’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे फिरणे. ‘परि’ या प्रत्ययाचा अर्थ आहे सगळीकडे, सभोवार, सर्वत्र; म्हणून पर्यटन म्हणजे सर्वत्र फिरणे. भूमितीत परिमिती, परिवर्तुळ असे शब्द येतात, तिथेही परि हा शब्द याच अर्थाने येतो.

-मेधा लिमये 

***

My Cart
Empty Cart

Loading...