मकर संक्रांतीला लहान बाळांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलेले तुम्ही पाहिले असेल. हे पांढऱ्याशुभ्र हलव्याचे दागिने बनवतात कसे? ते मिळतात कुठे? असे नाजूक, रेखीव, आकर्षक हलव्याचे दागिने बनवणाऱ्या दोन ताईंना या संक्रांतीच्या निमित्ताने भेटले. भक्ति धनंजय भागवत आणि श्रुती नाख्ये यांचा ‘शैली’ नावाचा ब्रँड आहे. त्या हस्तकलेच्या विविध वस्तू करतात. हलव्याचे दागिने ही तर त्यांची खासियतच आहे.
काटेरी हलवा करण्याचे खास यंत्र त्यांच्याकडे आहे. लहान-मोठा हवा त्या आकाराचा हलवा त्यात बनवता येतो. या नाजूक कामाचे प्रात्यक्षिकही बघायला मिळाले. हवे तितके हलव्याचे दाणे तयार झाले की ते गुंफून त्याच्या माळा किंवा सरी करणे हे काम सोपे नाही! हलव्याला मोत्यासारखे भोक नसते. त्यामुळे दोन दोऱ्यांच्या सरीमध्ये हलवा अडकवून गुंफला जातो. हे काम बघणेही खूप रंजक आहे. जराही लक्ष न ढळू देता योग्य प्रकारे दाब देत ही गुंफण करावी लागते.
लहान मुलांसाठी मुकुट, मनगट्या, बाजूबंद, बासरी आणि गळ्यातला हार; तर मुलींसाठी गळ्यातली माळ, कानातले, बाजूबंद, हेअरबँड, कंबरपट्टा, बांगड्या असे विविध दागिने या दोघी मिळून करतात. हलव्यापासून बाहुलीसुद्धा करतात. महिलांसाठी पारंपरिक व आधुनिक स्वरूपाचे हलव्याचे दागिनेही त्या बनवतात. काटेरी हलवा आणि दागिने करण्याची ही कलाकुसर बघायची आहे? संक्रांतीचा तिळगूळ खात हा व्हिडिओ बघा.
लिंक:- https://www.youtube.com/watch?v=Ac_zXNxl9kY
-क्रांती गोडबोले-पाटील
***