Menu

‘अवनी’ला मारणे– योग्य की अयोग्य?

image By Wayam Magazine 27 April 2023

यवतमाळ जिल्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील अवनी वाघीण वनखात्याला टी-हे नावाने परिचित होती. मागील काही महिन्यांत अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. माणसाच्या मांसासाठी चटावली होती. त्यामुळे ती उपद्रवी ठरली होती. तिने केलेल्या हल्ल्यात तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला होता. तिच्या हालचाली टिपण्यासाठी १०० कॅमेरे लावले गेले होते. त्या वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याने तब्बल २०० लोकांची टीम नेमून मोहीम सुरू केली होती. या वाघिणीला ३ नोव्हेंबर रोजी अनुभवी शूटरने ठार केले.  

दिवाळीच्या काही दिवस अगोदरच पांढरकवड्याच्या अवनी वाघिणीचा मृत्यू झाला. ही बातमी सगळ्याच वन्यजीवप्रेमींना चटका लावून गेली. दूरचित्रवाणी, वर्तमानपत्र यांतून याबद्दल उलटसुलट विचार प्रसिद्ध झाले. तुमच्याही मनात बरेच प्रश्न उभे राहिले असतील. वाघासारखे प्राणी नरभक्षक का बनतात, आणि जर बनले तर त्यांना मारून टाकणे हाच उपाय असतो का- हे प्रश्न सर्वांच्याच मनात रेंगाळत आहेत.  

माणूस हे काही वाघाचे भक्ष नाही. जर एखादा वाघ म्हातारा झाला, त्याला जंगलात शिकार करणे अशक्य झाले की तो मग नाईलाजाने माणसावर हल्ले करतो. एखाद्या तरुण वाघाने जर चुकून माणसावर हल्ला केला आणि त्याला माणसाच्या मांसाची चटक लागली की, मग तो नियमितपणे तसेच करू लागतो. वाघीण पिल्लांना शिकारीचं प्रशिक्षण देत असते. त्यामुळे नरभक्षक वाघिणीची पिल्लेही नरभक्षक बनण्याची शक्यता असते. नरभक्षक वाघाच्या लाळेचे नमुने त्याने मारलेल्या माणसाच्या शरीरावरून गोळा केले जातात. मृत शरीराच्या आजूबाजूला पडलेल्या वाघाच्या केसांचे नमुनेही गोळा केले जातात. या नमुन्यांमधील डी.एन..चे प्रयोगशाळेत परीक्षण करून नरभक्षक वाघाची वैयक्तिक ओळख पटवता येते. जंगलातील वाघांच्या विष्ठेच्या नमुन्यांमधील डी.एन.. चे विश्लेषण केले जाते. स्थानिक सरपंच, स्वयंसेवी संस्था व वनखात्यातील उच्चस्तरीय अधिका-यांची कमिटी नरभक्षक वाघाची ओळख पटवून त्याला पकडण्याचा निर्णय घेते

अशा नरभक्षक बनलेल्या वाघाला मारणे हाच एकमेव पर्याय असतो असे नाही, खरेतर. वाघाला बेशुद्ध करून पकडता येते किंवा सापळा पिंज-यात बंदिस्त करता येतेत्यासाठीच्या बेशुद्धीकरणाच्या बंदुका, औषधे आणि फायबरचे सापळे, पिंजरे वनखात्याकडे उपलब्ध असतात. परंतु अशा त-हेने वाघाला पकडणे हा एक त्या समस्येवरचा तात्पुरता उपाय झाला. पुन्हा नवा वाघ नरभक्षक बनला तर आपण अशा किती वाघांना निसर्गातून उचलून पिंज-यात बंदिस्त करणारपिंज-यातला वन्यप्राणी हा शेवटी पर्यावरणाच्या दृष्टीने मृत झाल्यातच जमा असतो.

समस्या निर्माण झाल्यावर उपाय करण्यापेक्षा वाघासारख्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला समस्या निर्माण होऊच नये असे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी व्याघ्र संरक्षण प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांच्या सीमेलगत किंवा जंगलात जी मनुष्यवस्ती आहे त्यांना आपण वन्यप्राण्यांशी कसे वागले पाहिजे आणि कसे वागता कामा नये, याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. जेव्हा जंगल व शेती बाजूबाजूला असते तेव्हा शेतक-यांना कशाप्रकारे शेती व जंगलात वावरले पाहिजे, हे समजणे आवश्यक आहे. अवनी वाघीण ज्या भागात होती, त्या यवतमाळच्या भागात कापसाची शेती, जंगलाचे विरळ पट्टे, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनने लागवड केलेली बांबू व सागाची लागवड एकमेकांलगत आहे. कापसाच्या एका शेतातून दुस-या शेतात जाण्यासाठी शेतक-यांना जंगलातूनच जावे लागते. जंगलातील वन्यप्राण्यांचे नैसर्गिक वागणे कसे असते हे ब-याचदा सामान्य माणसाना ज्ञात नसते. त्यातूनच मानव-वन्यजीव संघर्ष उभा राहतो

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती-मानव संघर्षात काम करताना मला असे दिसून आले होते की, हत्ती मानवी वस्तीत आला तर माणसे त्याच्यावर दगड मारून त्याला हुसकावून लावायचा प्रयत्न करायची. हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची. त्यातून मग हत्तींचे माणसांवर हल्ले व्हायचे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माणच होऊ नये यासाठी सामान्य लोकांमध्ये जाणीवजागृती करण्याची आवश्यकता आहे.

अवनीच्या मृत्यूने निर्माण झालेले हे वादळ काही काळात शमेलही. परंतु तिच्या मृत्यूने निर्माण झालेल्या काही प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला शोधावीच लागतील. तरच आपले वन्यजीव अधिक सुरक्षित होतील

आपण आपापल्या घरी दिवाळी साजरी करत असताना वनखात्यातील पोलीस दलातील १०० हून अधिक जण त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून जंगलात फिरून अवनीच्या पिल्लांचा अहोरात्र शोध घेत होती. कारण अवनीच्या मृत्यूनंतर अनेक दिवस तिच्या दोन बछड्याचे दर्शन झाले नव्हते. हे बछडे स्वतः शिकार करायला शिकत नाहीत तोपर्यंत वाघिणीने केलेल्या शिकारीवर आणि तिच्या दुधावर त्यांचे पोट भरत असते. अवनीने २९ ऑक्टोबरला अखेरची शिकार केली होती. परंतु त्यानंतर तिने एकही शिकार केलेली नव्हती. त्यामुळे तिचे दोन लहान बछडे उपाशी राहतील आणि भुकेने मृत्यू पावतील की काय, अशी भीती प्राणिमित्रांना आणि वनखात्यातील मंडळींना वाटत होती. नंतर कालांतराने त्यांचे  झाले, तेव्हा सार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला

-डॉ. विनया जंगले

My Cart
Empty Cart

Loading...