'वयम्' मित्रांनो,
एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती!
या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या सकारात्मक बातम्या वाचून मनाला आनंद होतो. (लष्करात महिलांना कायम पदे देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जे युक्तिवाद झाले, ते जरा गुगल करून समजून घ्या.) मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करणाऱ्या गटातील माणसे जसजशी वाढत जातील, तसतसे मुली व महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी होत जातील.
आपण नक्की मुले-मुली यांच्यात समभाव मानणाऱ्या गटात आहोत ना, हे स्वत: कायम तपासात राहिले पाहिजे हं! कारण असे आहे ना की, मुले-मुली भेदभाव समाजातील अनेकांच्या मनात घट्ट रुजलेला असतो. त्यांचे बघून आपणही काही वेळा चुकून तेच अनुसरतो. त्यांचा राग करण्यात अर्थ नाही, कारण ते तसेच बघत, ऐकत मोठे झालेले असतात ना! आपण आधुनिक काळात वाढतोय. मुलगा आणि मुलगी वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील कोणीच कमी-जास्त क्षमतेचे नाही, हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळे भेदभाव मानणारी माणसे आजूबाजूला दिसली तरी आपण त्यांचे म्हणणे, वागणे मनावर घ्यायचे नाही आणि आपण स्वत: भेदभाव मानायचा नाही, हा निर्धार पाहिजे.
काही साध्यासुध्या गल्लती आपण करतो काही वेळा. म्हणजे वर्गातील एखाद्या मुलाला रडू आले तर, “काय मुलीसारखं रडतोयस?” असे म्हणून मोकळे होतो. कुणाला ‘बायल्या’ म्हणून हिणवतो. शाळेत एखादा कार्यक्रम साजरा करण्याआधी आयोजनाची आखणी करतो तेव्हा स्वागत करायला मुलींची; आणि बाकडी रचायला, जाजम अंथरायला मुलग्यांची ड्युटी लावतो. अशाने मुलींना वाटू शकते की, आपण केवळ नटूनथटून मिरवून घेतले की आपले कौतुक होते! आणि मुलग्यांचे मन खदखदू शकते की, आम्ही आपली मेहनतीची कामे करायची आणि त्या कामाचे तसेही कौतुक होत नाहीच. घरात बल्ब बदलायचाय तर काही मुली मागे राहतात आणि स्वयंपाकघरात मदत करायची असेल तर काही मुलगे पळ काढतात. सर्वांना सर्व प्रकारची आवश्यक ती कामे यायला पाहिजेत, तरच आपण ‘हे काम मुलग्याचे आणि ते मुलीचे’ असे गृहीतक ओलांडून पुढे जाऊ.
कुणाला अपमानास्पद वाटेल किंवा त्यांच्या मनाला टोचेल असे टोमणे मारणे, छेड काढणे असे प्रकार रस्त्यात, चौकात, मैदानात सर्रास घडताना दिसतात. हे नुसते चुकीचे नाही, तर हा गुन्हा आहे. पण अनेकजण मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात असताना, केवळ त्यांच्यातील एक बनून राहायला हवे म्हणून, जे होते ते चालवून घेतात. अशाने आपण त्या व्यक्तीचा अपमान तर करतोच, पण हीन वृत्ती पसरवायला कारणीभूत होतो. त्यातूनच विकृती घडू शकते.
मुळात हेही समजून घ्यायला पाहिजे की, स्त्री-पुरुष समानतेकडे प्रवास चालू आहे आपल्या समाजाचा. प्रत्येक पिढीत तो पुढच्या टप्प्यांवर गेला पाहिजे, अधिकाधिक वेगाने. म्हणूनच आजही काही ठिकाणी मुली-महिलांसाठी आरक्षण (Reservation), प्रोत्साहन (Incentive) असते... शिक्षणात, स्थानिक पातळ्यांवरील निवडणुकीत, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, इत्यादी. याचे कारण त्यांना समान संधी, समान न्याय मिळाला तर त्या समाजात समान कामगिरी गाजवू शकतील, म्हणून! हा भेदभाव नाही, तर हा असतो समभावाच्या प्रवासातील एक टप्पा! हेही या निमित्ताने समजून घेतले पाहिजे. ही संकल्पना समजावणारे एक चित्र मध्यंतरी पाहिले होते. ते मुद्दाम इथे देत आहे. (कुणाचे आहे, ते नेमके आठवत नाही.)
मध्यंतरी घडलेला एक प्रसंग- एक लहानगा मुलगा त्याच्याहून छोट्या असलेल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेला. तिथे त्याच्या आईने त्या मुलीसाठी मस्तसा किचन-सेट दिला. हा मुलगा हिरमुसला, कुरबुरला. त्याच्याकडे कधीच नव्हता तसा किचन-सेट किंवा भातुकली. आईला समजली तिची चूक. परत येताना तिने तिच्या मुलासाठीही घेतला तस्साच!
समाजात सर्वत्र परस्परांच्या भावनांचा विचार, वेगळेपणाचा स्वीकार, क्षमतांचा आदर... हे सर्व निकष आहेत समानतेचे आणि माणुसकीचे! ही माणुसकी रुजली ना पक्की मनात, की भेदभाव पूर्णत: लयाला जाईल, नक्कीच!
-शुभदा चौकर
***