Menu

गप्पाटप्पा... भाषा फुलवा !

image By Wayam Magazine 21 February 2024

‘वयम्’ दोस्तांनो,

तुम्ही मित्रमंडळी आपापसात बोलण्यासाठी खास भाषा तयार करता. हो ना? तुमची सिक्रेटस् शेअर करण्यासाठी तुम्ही अनेकदा तुमच्या खास भाषेचा वापर करता. ती भाषा डीकोड करणे बाकीच्यांना कठीण होते. पण मला सांगा, अशी खास भाषा तुम्हांला का तयार करावीशी वाटते? कारण, तुम्हांला गॉसिपिंग करायचे असते, म्हणून! एकाबद्दल दुसऱ्याला कुजबुजत्या आवाजात सांगताना अशी खास भाषा कामी येते. मग तुम्ही तयार केलेल्या अशा भाषेतले अनेक शब्द कालांतराने सर्वमान्य होत जातात. ते आपल्या गप्पांमधून सहज जन्म घेतात आणि रुळतातही. गॉसिपिंगच्या अनेक छटा असतात. कधी नुसत्याच बाष्कळ गप्पाटप्पा, कधी गुपिते सांगणे, कधी कुचाळक्या, कधी चहाड्या, कधी काड्या लावणे, कधी उगाच कंड्या पिकवणे... पण गंमत म्हणजे एखादी भाषा विकसित होण्यात या सर्व प्रकारच्या गॉसिपचा वाटा फारच मोठा असतो. कारण अशा गम्मतगोष्टी सांगताना आपण वेगवेगळ्या छटा व्यक्त करणारे शब्द वापरतो. अशाने भाषेत नवनव्या शब्दांची भर पडत जाते. ते शब्द एकेका गटात रुळत जातात; नंतर दुसऱ्या गटांपर्यंत संक्रमित होत राहतात. जसजसे आपले मित्रमंडळ विस्तृत होत जाते, तसतसे नवे शब्द अधिकाधिक प्रसारित होत जातात आणि मग भाषा विस्तारित होते. 

आपल्या भारतात मान्यताप्राप्त २२ भाषा असल्या, तरी सुमारे १६०० मातृभाषा आहेत. आपल्या आसपास वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारी माणसे असतात. प्रत्येकाच्या मातृभाषेतून आलेले वेगवेगळे शब्द या प्रमुख भाषांत मिसळले जातात, ते या गप्पागोष्टींमुळेच. आपण वेगवेगळ्या प्रांतात जातो तेव्हा बोलीभाषेतून गप्पा ऐकताना मजा तर येतेच, पण त्या त्या भाषिक लोकांकडे त्या त्या प्रांतातली कितीतरी माहिती असते, तीही कानावर पडते. ‘युनायटेड नेशन्स’तर्फे २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा होतो. जगभर बोलल्या जाणाऱ्या सर्व मातृभाषा जिवंत राहाव्यात, त्या भाषांतून व्यक्त होणारे ज्ञान लुप्त होऊ नये, हा त्यामागचा उद्देश. 

अरण्यतज्ज्ञ मारुती चितमपल्ली हे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व. पुस्तकी अभ्यासाच्या बरोबरीने त्यांनी ठिकठिकाणच्या वनवासींशी गप्पागोष्टी करत ज्ञानाचा खजिना जमवला. त्यांची पुस्तके वाचताना जंगलातल्या सृष्टीचे वर्णन करणारे अनेक शब्द वाचायला मिळतात. चिरपल्लवी वृक्ष (सदाहरित झाडे), सारंगागर (हेरॉन पक्ष्यांची वस्ती) असे हजारो सुंदर शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले आहेत. अनुभवातून मिळवलेले ज्ञान बोलीभाषांमधून व्यक्त होत असते. त्याचप्रमाणे बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेतून रचलेल्या कविता समजून घेतल्या की, त्यांची निरीक्षणशक्ती आणि विचार किती मार्मिक होते, ते लक्षात येते. 

अशा अनेक बोलींचे शब्द मिळून आपली मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. अलीकडे आपण अनेक हिंदी, इंग्रजी शब्द सवयीने आपल्या बोलण्यात वापरतो. पण त्याच बरोबरीने आपण आपल्या भाषेतले शब्द निर्माण करत राहिलो तर आपली भाषा अधिकाधिक संपन्न होत राहील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कित्येक इंग्रजी शब्दांसाठी सोपे मराठी शब्द योजले- कार्यालय, चित्रपट, महापौर, छायाचित्रण, असे अगणित. 

कोणताही विषय आपल्याला आपल्या भाषेत सोप्या व रसाळ पद्धतीने सांगितला की छान समजतो, आपलासा होतो. आपल्या ‘वयम्’ मासिकात आपण असा प्रयत्न कायम करतो. विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी, तुमच्या कुतूहलाचे विषय तुम्हांला समजावणारे लेख आपण प्रसिद्ध करतो, ते वाचून काही वेळा तुमचे पालकही आवर्जून कळवतात की आम्हांलाही हे नव्याने कळले! 

पद्मश्री सन्मान मिळालेले भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचे एक व्याख्यान मागे ऐकले होते. ते म्हणाले होते, की पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आपल्याला माहीत झाले आहे. तितकेच महत्त्व आपण आपल्या भाषांना दिले नाही तर पुढच्या ३०-४० वर्षांत भारतातल्या शेकडो भाषा मरून जातील. मराठी भाषेत आपण नवनवीन विषयांसाठी सुयोग्य शब्दांची पेरणी केली नाही तर आपली ही समृद्ध भाषा खुजी होईल. त्यामुळे बौद्धिक आळस न करता नवे शब्द निर्माण करत राहा!

याच महिन्यात कवी कुसुमाग्रज जयंती, म्हणजे ‘मराठी भाषा दिन’ही आहे आणि ‘विज्ञान दिन’ही. विज्ञान, तंत्रज्ञानाशी निगडित अनेक इंग्लिश शब्द वापरता वापरता आपण आपल्या मातृभाषेतील नवे शब्द निर्माण करण्याचा आणि ते वापरण्याचा प्रयत्न करत राहूया. 

-शुभदा चौकर 

***

My Cart
Empty Cart

Loading...