Menu

रंग-रंगिली दुनिया!

image By Wayam Magazine 21 March 2024

पक्षी, मासे, फुलपाखरे आणि माश्या आपल्यापेक्षा जास्त रंग पाहू शकतात. अशा प्रजाती दशकोटीपर्यंत (10 Crores) रंग पाहू शकतात. आपण किती रंग पाहू शकतो, माहितीये?

आपल्याला निसर्गाकडून अनेक अनमोल देणग्या मिळाल्या आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे रंग.

आदिमानवसुद्धा आकाशाचा निळा, पानांचा हिरवा, सूर्याचा पिवळा अशा रंगांनी मोहित झाला असावा. आदिमानवाने त्याच्या फावल्या वेळात गुहेत चित्रे काढली व ती नैसर्गिक रंगांनी रंगवली आहेत.

आपल्याला रंग कसे दिसतात? एखाद्या वस्तूकडे पाहिले असता त्या वस्तूवरून परावर्तित (reflect) होणारे प्रकाशकिरण आपल्या नेत्रपटलावर (Cornea) एकवटतात. तेथे रंगांची जाण होऊ शकणाऱ्या शंकूपेशी (Cone Cells) असतात. या पेशी एक प्रकारच्या चेतापेशीच (Neurons) असतात. या शंकूपेशी (Cone Cells) रंगांसंबंधी संदेश मेंदूकडे पाठवतात.

मेंदूमध्ये त्या संदेशांचा अर्थ लावला जातो व आपल्याला रंगांचे ज्ञान होते. पांढरा प्रकाश हा सात निरनिराळ्या रंगांचा बनलेला असतो. प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of Light) घडवून आणले असता सात रंगांची वर्णपंक्ती (Spectrum) मिळते, हे सर्वप्रथम न्यूटनने सिद्ध केले.

वस्तूकडून परावर्तित (reflect) होणाऱ्या निरनिराळ्या प्रकाशकिरणांची गती (speed) वेगवेगळी असते. म्हणूनच तांबडा, पिवळा असे काही रंग आपल्याला प्रथम दिसतात. लाल रंगाची तरंगलांबी (Wavelength) सर्वांत जास्त असल्याने तो रंग चटकन नजरेत भरतो.

म्हणूनच धोकादर्शक संकेत कायम लाल रंगात असतात. त्याच्या खालोखाल नारिंगी आणि पिवळ्या रंगांची तरंगलांबी असते, म्हणून तर स्कूल बस आणि खोदकाम करणारी वाहने (Earth Movers) शक्यतो पिवळ्या रंगाची असतात. जेवढी जास्त तरंगलांबी (Wavelength) तेवढी जास्त दृश्यमानता (Visibility)!

मानवी मनाचा रंगांशी जवळचा संबंध आहे. रंग पाहिले असता मानवी मनात विविध विचार-तरंग उमटतात; भावना निर्माण होतात. लाल, पिवळा हे रंग उत्साहवर्धक, चैतन्यदायी आहेत.

काळा, करडा हे रंग थोडेसे नकारात्मक भावना निर्माण करतात. निळ्या रंगामुळे शांततेचा भाव मिळतो. अर्थातच रंगांचा हा परिणाम कायमस्वरूपी नसतो.

रंग सर्वांना एकसारखे दिसतात का? ह्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे द्यावे लागेल. मानवाला होणारे रंगांचे ज्ञान हे आनुवंशिक (Hereditary) असते. नेत्रपटलावरील (Cornea) शंकूपेशींची (Cone Cells) देणगीही अनुवंशाने (Hereditary) मिळते. त्या मुळेच काही जण रंग व त्यांच्या छटांतील सूक्ष्म बारकावे ओळखू शकतात. क्वचित काही जण सामान्य मानवापेक्षाही वेगळे, जास्तीचे रंग व त्यांच्या छटा पाहू शकतात. तर काही मानवांच्या नेत्रपटलावर (Cornea) शंकूपेशींचे (Cone Cells) अस्तित्वच नसते किंवा कमी असते. त्यामुळे त्यांना दोन रंगांतील फरक ओळखणे अवघड जाते. अशा व्यक्तींना ‘रंगांधळे’ (Colour Blind) असे संबोधले जाते.

रंगांचे हे रूपच न्यारे

एकेकट्याचे सौंदर्य गहिरे

परि मिसळता एकमेकांत ते

रंगछटांचे आगळेच नजारे

तांबडा, पिवळा व निळा हे मूळ रंग आहेत. कोणत्याही दोन मूळ रंगांचे मिश्रण केले की दुय्यम रंग मिळतात, जसे तांबडा + पिवळा = नारंगी. एक मूळ रंग व एक दुय्यम रंग यांच्या मिश्रणातून तृतीय श्रेणीचे रंग तयार होतात, जसे तांबडा + हिरवा = तांबडा करडा. एखाद्या रंगात पाणी किंवा पांढरा रंग मिसळला की, त्या रंगांची उजळ छटा तयार करता येते. एखाद्या रंगात काळा किंवा त्या रंगाच्या विरोधी रंग मिसळला की गडद छटा तयार होते. पांढरा रंग म्हणजे प्रकाशाचा पूर्ण प्रभाव व काळा हा प्रकाशाचा पूर्ण अभाव. पांढऱ्या आणि काळ्या रंगांना ‘अवार्णिक’ रंग म्हणतात, तर प्राथमिक व दुय्यम रंगांना ‘वार्णिक’ रंग म्हणतात. पांढरा आणि काळा एकमेकांमध्ये विविध प्रमाणात मिसळले, की काळ्यापासून पांढऱ्याकडे जाणाऱ्या करड्या रंगाच्या छटा मिळतात. वार्णिकांमधील कोणतेही दोन मूलभूत रंग घेऊन विविध प्रमाणात मिश्रण केले की अनेक रंगछटा मिळतात जसे-

तांबडा + जांभळा = ताजा, जांभळा + निळा = जानि, ह्यानंतर, ता + ताजा = ताताजा, ता + ताताजा = ताताताजा

अशाप्रकारे ताजाजा, ताजाजाजा, जाजानि, जानिनि, जाजाजानि अशी आणि अनेक सूक्ष्म अवस्थांतरे मिळवता येतात. ही अवस्थांतरे ‘Hue’ म्हणजेच ‘वर्णविशेष’ ह्या संज्ञेने दर्शवितात.

उदा. ताताताजा हा तांबड्याचा वर्णविशेष आहे. अशा तऱ्हेने आपल्याला अक्षरशः अगणित रंग व त्यांच्या छटा मिळतात.

BOX 1 – तुम्हांला किती रंग माहीत आहेत, त्यांची यादी करून बघा. त्या रंगांची नावे आणि त्यापुढे त्यांचे वर्णविशेष/Hue अशीही यादी करा, मजा येईल!

एखादा रंग जरी आपण घेतला, तरी त्या रंगाच्या अनेक छटा आपल्याला निसर्गात बघायला मिळतात. सूर्यफुलाचा पिवळा, हळदी पिवळा, लिंबाचा पिवळा, आंब्याचा पिवळा आणि सूर्यकिरणांचा सोनपिवळा! आहेत ना ह्या पिवळ्या रंगाच्या विविध छटा? तशाच इतर सर्व रंगांच्या अनेक छटा निसर्ग दाखवतो. निसर्गातल्या ह्या प्रत्येक रंगछटेला एक क्रमांक देऊन सूत्रात बसवता येते.

Box 2 - आपली मराठी भाषा तर अशा रंगछटादर्शक शब्दांनी अगदी श्रीमंत आहे. अशा रंगांच्या छटा व त्यांचे शब्द यांच्या संगती जुळवल्यास तो एक शब्द-खजिनाच ठरेल.

आपला डोळा किती रंग पाहू शकतो कल्पना आहे? – आपण १० लाखांपर्यंत विविध रंग पाहू शकतो. मानवी डोळ्यांत तीन प्रकारच्या रंगसंवेदी शंकूपेशी (Colour Sensitive Cone Cells) असतात. त्या पेशी कमी, मध्यम व जास्त अशा तीन प्रकारच्या तरंगलांबीचे (Wavelength) रंग वेगळे ओळखू शकतात. म्हणूनच मानवांना Trichromats (tri :तीन, chroma :रंग) असे म्हणतात. कुत्रे व इतर काही सस्तन प्राणी (mammals) Dichromats (Di : दोन ) असतात, कारण त्यांच्यात दोनच रंगसंवेदी (colour sensitive cone cells) शंकूपेशी असतात. परंतु काही पक्षी, मासे, फुलपाखरे आणि माश्या Tetrachromats (tetra : चार ) असतात. त्यांच्यात चार प्रकारच्या शंकूपेशी (cone cells) असतात. अशा प्रजाती दशकोटीपर्यंत (10 Crores) रंग पाहू शकतात. थोडक्यात, ज्या रंगछटांना आपण एक रंग म्हणून ओळखतो, तो रंग हे प्राणी अनेक रंगांत पाहू शकतात. मानवी डोळा इंद्रधनुषी सात रंग

व त्यामुळे तयार होणारे इतर अनेक रंग पाहू शकतो. पण तांबड्याच्या पलीकडे अवरक्त (infrared) आणि जांभळ्याच्या पलीकडे जंबूपार (ultraviolet) असे रंग आहेत. पण ते रंग आपण पाहू शकत नाही. अजब आहे ना ही रंगकिमया?

शास्त्रज्ञ सतत नवनवीन रंगांचा शोध घेतच असतात. दोन किंवा अधिक मूळ रंग, दुय्यम रंग ह्यांचे प्रमाण कमी अधिक करून सतत नूतन रंगांची निर्मिती केली जाते. २००९साली अमेरिकेतील ऑरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी एका वेगळ्याच निळ्या रंगाची निर्मिती केली. काळ्या रंगाचे मँगनीज डाय ऑक्साइड इतर काही रसायनांबरोबर जवळपास दोन हजार फॅरनहिट तापमानास भट्टीत (furnace) तापविल्यावर  ‘Vivid Blue’ नावाचा निळा रंग मिळाला.

संगणक किती रंग छटा दर्शवू शकतो, माहीत आहे का? प्रत्येक रंगाला त्याची अशी एक वेगळी तरंगलांबी (Wave Length) असते. ह्या तरंगलांबीच्या (Wave Length) मापनामुळे कोणत्याही आणि कितीही रंगांचे मिश्रण केले असता त्या मिश्रणातून नेमका कोणता रंग अथवा छटा तयार होईल हे सूत्राने (formula) नेमके काढता येते. घराला कोणता रंग दयायचा ते आपण निश्चित केले की, त्या रंगाचा क्रमांक संगणकाला सांगितला की, संगणकाद्वारे आपल्याला हवी तशी नेमकी रंगछटा तयार करून मिळते. इथे “उन्नीस-बीस”ला वावच नाही. हल्लीच्या अद्ययावत संगणकांवर दीड कोटींहून अधिक रंगछटा दिसतात.

हल्ली अत्याधुनिक कॅमेरे, त्यांचे रेझोल्यूशन, त्यांची पिक्चर आणि कलर क्वालिटी यांमध्ये आता अधिकाधिक अचूकता आली आहे. तुम्हा मुलांनासुद्धा उत्तम रंगसंगती दर्शविणारा कॅमेरा असलेला मोबाइल फोन हवा असतो. अशा कॅमेऱ्यांनी काढलेले फोटोही छान येतात. ही जादू जशी त्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांची आहे, तशीच रंगांच्या वैविध्याचीही आहे. या रंगांनी मानवाला कायमच भुरळ पाडली आहे. तर अशी ही रंगांची रंग-रंगिली दुनिया!

आहेत रंग म्हणून आहे उत्सवी होळी

आहेत रंग म्हणून दिवाळीची रांगोळी

या रंगांनीच मिळे इंद्रधनुष्या झळाळी

रंगांचीच उधळण होतसे सांज-सकाळी

-सुजाता छत्रे

***

My Cart
Empty Cart

Loading...