पाडव्याची गुढी आहे
उंच उंच उभी
यशश्रीचा वेध घेत
डोकावत असते नभी
गुढी बाईने नेसला आहे
शालू पिवळाशार
आंब्याची डहाळी डोई
हिरवी हिरवी गार
कैरीची कर्णफुले डुलती
गुढी बाईच्या कानी
अंगणात उभी गुढी
जशी काही महाराणी
नव्या नव्या नवरीसारखी
पाटावर बसली
लाज लाजून गुढीबाई
गालामध्ये हसली
गुढीला आवडतात
पाने कडुलिंबाची
गुढीच्या गळ्यात शोभे
माळ बत्ताशांची
पोपटी चैत्र पालवी
घेऊन येते गुढी
आरंभ नववर्षाचा
करून देते गुढी
टोकावरती शिरस्त्राण आहे मंगल कलशाचे
पाडव्याची गुढी म्हणजे
प्रतीक विजयाचे
गुढीची ही उंच काठी
हे रूप आदिशक्तीचे
गुढीपाडवा पूजन आहे
शक्तीचे आणि भक्तीचे
हा मुहूर्त आरंभाचा
ध्येयाचा संकल्प करू
जिद्दीने परिश्रमाने
यशाची गुढी उभारू..
-डॉ. सुरेश सावंत
***