Menu

चिमण्यांनाही हवंय 'जिम'!

image By Wayam Magazine 17 March 2023

अलीकडे अनेक ठिकाणी स्थूल (Obese) चिमण्या पाहायला

मिळतात. लक्षात आलंय तुमच्या? असं का होत असेल? २० मार्च हा

जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day). त्यानिमित्त चिमणी

आणि अन्य पशू-पक्ष्यांची ही समस्या जाणून घेऊ या!


मुक्या जीवांबद्दल तुम्हांला खरंच प्रेम वाटतं ना? मग ते व्यक्त करताना चुका टाळायला हव्यात. प्रेमापोटी

प्राण्यां-पक्ष्यांना प्रक्रिया केलेलं अन्न (Processed Food) खायला घालणं अगदी पूर्णपणे टाळायला हवं. काही

जण आपला आवडता खाऊ त्यांनाही देतात. म्हणजे शेव, वेफर्स व कुरकुरेसुद्धा!

बी. एस. Forestry च्या तिसऱ्या वर्षी आम्हांला महाविद्यालयातून रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात नेलं

होतं. सफारी करताना एक गोष्ट मला खटकली की, आम्ही खूप जवळ गेलो तरी पशू-पक्षी पळून जात नव्हते. हा

त्यांचा खरा स्वभावधर्म नाही. माणूस पाहिल्यावर पटकन पळ काढणं हा पशुपक्ष्यांचा खरा स्वभाव असतो.

(ह्याला काही थोडके अपवाद असतात.) रणथंबोरमध्ये माणसाच्या अंगावर पक्षी येऊन बसतात, हे आश्चर्य

वाटलं. पक्ष्यांना आयतं खायला घातल्यामुळे त्यांच्या वागण्यात असा फरक होत आहे. पोपट (Parakeets),

टकाचोर (Rufous Treepie), सातभाई (Jungle Babbler) या पक्ष्यांना पर्यटकांनी खायला घालून पूर्ण

माणसाळवलं आहे. त्यांना इतकं माणसाळलेलं पाहून मला त्यांची दया आली आणि अशा माणसांचा रागही येऊ

लागला.

अनेकवेळा गडकिल्ल्यांवर काही जण माकडांना खायला घालतात. माकड हा खूप हुशार प्राणी आहे.

अनुभवातून त्यांना समजलं आहे की, आपण थोडं जरी आक्रमक झालो तरी माणूस घाबरतो. आता तर अशी

परिस्थिती झाली आहे की अनेक पर्यटनस्थळी माकड, वानर सर्रास माणसांवर धावून येतात, हल्ले करतात.

पाळीव सोडून कोणत्याही प्राण्याला किंवा पक्ष्याला आपण खायला घालायची गरज नाही. निसर्गाने

प्रत्येकासाठी खाण्याची सोय केलेली आहे. प्रत्येक जिवाला माहिती असतं की, त्यांना कुठे व काय खायला

मिळेल.

पशुपक्ष्यांना आयतं खायला घातल्यामुळे ते स्वतःचं अन्न शोधण्याची क्षमता घालवून बसतात. त्यामुळे

पशुपक्ष्यांना आळस येतो आणि त्यांना स्थूलता (Obesity) येते. त्यांच्या हालचाली मंदावतात. कबूतरांना तर

अनेक जण धान्य किंवा चणेदाणे खायला घालतात. त्यामुळे कबूतरांची संख्या बेसुमार वाढली आहे.

कबूतरांचे परिसंस्थेत काहीही काम नाही. त्यांच्यामुळे माणसांना श्वसनाचा, दम्याचा त्रास होऊ

लागला आहे. त्यामुळे एवढ्या कबूतरांचा बंदोबस्त कसा करायचा हा प्रश्न मोठा झाला आहे.


साधारणपणे ५० ग्रॅम वजन असलेली चिमणी दिवसाला तिच्या वजनाच्या दुप्पट खाते. कारण खाणं

शोधण्यामध्येच तिची ऊर्जा जाते. त्यामुळे तिने खाल्लेलं सगळं तिला पचतं. पण माणसाने खायला घातलं की,

शोधाशोध करण्यात ऊर्जा खर्च होत नाही. त्यामुळे अलीकडे शहरांत स्थूल (Obese) चिमण्या पाहायला

मिळतात. म्हणजे माणसांना होणारा हा त्रास आता चिमण्यांना होऊ लागला आहे, हे किती विचित्र आहे!

त्यांच्यासाठी ‘जिम’ म्हणजे खाणं शोधण्यासाठी त्यांची पळापळ होत राहणं!

आपलं पशुपक्ष्यांवर प्रेम असेल तर त्यांचा अधिवास (Habitat) टिकवण्यासाठी प्रयत्न करू या.

उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. म्हणून आपण त्यांच्यासाठी भरपूर आणि स्वच्छ पाणी

जरूर ठेवायला पाहिजे. पण खायला देणं मात्र टाळायला हवं. टाळणार नं?

-उन्मेष परांजपे

(निसर्ग-अभ्यासक)

My Cart
Empty Cart

Loading...