Menu

"हो हो हो"

image By Wayam Magazine 04 December 2023

रोज सुपरफास्ट वेगाने येणारी अवनी एक्सप्रेस आज एकदम मालगाडीच्या वेगाने आली, तेव्हाच मेधाला कळले की, आज बाईसाहेबांचे काहीतरी बिनसले आहे. पण लगेच विचारले असते तर नाक फेंदरून, ‘काहीच नाही’ म्हणाली असती बया. आता तर तिला एकच प्रश्न तीन वेळा विचारलेलासुद्धा आवडत नाही, बरं तिने तिन्ही वेळा उत्तर नाही दिले तरी चालते, पण आम्ही मात्र न चिडता, सांगेल नंतर, असे म्हणायचे, नाहीतर सोडून द्यायचे. वयात येणाऱ्या मुलांशी वागणे काही सोपे नसते, असे म्हणताना तिला तिचे आणि आईचे खटके आठवायचे. तेव्हा ती सुपात होती, आज ती जात्यात आहे. 

“आज कोणाशी भांडण झालं? विषय नेहमीचाच BTS का?”

“आई, मी फक्त भांडते का? तुला पण असंच वाटतं का?”

“म्हणजे माझा खडा बरोबर लागला आहे तर. चल भांडण नाही म्हणत, वादविवाद कोणाबरोबर घातलास?”

“अगं, बघ ना, मी बसमध्ये एकदम एक्साइट होऊन सांगत होते की कसं आम्ही दरवर्षी ख्रिसमस ट्री घरी लावतो, ते सजवतो, आपलं पुस्तकांचं डेकोरेशन आणि असं सगळं... तर तो प्रणव एकदम म्हणाला, ‘आपले सण सोडून तुम्ही हे सगळं काय करता?’ मग काय.. मी पण त्याला जोरदार उत्तर दिलं. सोडेन का मी अशी? आमचं भांडण इतकं वाढलं, की बसमध्ये असलेल्या यास्मिन मॅमला मध्ये पडावं लागलं.”

आता ‘तिने’ भांडण म्हणले तरी चालेल इतकीच नोंद मेधाने मनात केली. तिला विचारले, “मग पुढे काय झालं?”

“अगं काय होणार, मॅम म्हणाल्या- सण असतात सेलिब्रेशनसाठी, त्यावर तुम्ही कशाला भांडता?”

तर हा चक्क त्यांना म्हणाला, ‘मॅम, तुम्ही साजरी करता का दिवाळी?’ हाऊ रुड?

मॅम बोलायच्या आधी मीच त्याला म्हटलं, मी तुझी कम्प्लेन्ट करणार आहे. त्या आपल्याला शिकवत नसल्या तरी एक टीचर आहेत. जरा आदर ठेव. कोणी कोणते सण साजरे करायचे की नाही ते नंतर बघू, पण आधी आदर करायला शिक. तेवढ्यात त्याचा स्टॉप आला आणि तो उतरून गेला. मला त्याला अजून जास्त सुनवायचं होतं. मी उतरताना मॅम मला काय म्हणाल्या माहितीये, ‘फेस्टिव्हल्स मिन्स हॅपीनेस, जर त्याला इतकं साधं समजत नसेल तर दाखवून दे, मेक हिम एक्सपिरीयन्स इट, अनुभव शब्दांपेक्षा मोठा असतो.’

मेधाने फक्त मान हलवली. कारण लेकीच्या मनात जे असेल तेच ती करणार होती. अगदी आता १३ वर्षांची झाली आहे म्हणून.. नाही तर पहिल्यापासूनच तिला पटल्याशिवाय ती काही करणार नव्हती. तिने तिच्या चुलत बहिणीकडे, मामेभावाकडे बघितले म्हणून घरी ख्रिसमस ट्री ठेवायला लावला, आणि बेडवर मोजा लावायला जागा नव्हती म्हणून ती एक खुर्ची तिथे ठेवून त्याला मोजा लावून झोपायची. ते सगळेच मजा म्हणून या सगळ्याकडे बघत होते. पण मग नंतर दोन-तीन वर्षांनी तिला कळले की असा सांताक्लॉज वगैरे काही नसतो. मग तिने हे असे का ठेवतात, मुलांना गिफ्ट्स का देतात, या सगळ्याची माहिती काढली आणि आईबाबांना सांगितले की आपण दर महिन्याला एक पुस्तक आणि खेळणे विकत घेत जाऊ. खेळणे छोटेसे असले तरी चालेल, पण घेऊ. वर्षाच्या शेवटी ते ख्रिसमसच्या झाडावर लावू आणि मग ते जवळच्या झोपडपट्टीतल्या मुलांना वाटू. खेळणी आणि पुस्तके माझी वाचून, खेळून झालेली असतील तोपर्यंत. त्यामुळे मला नवीन खेळणी घेतल्याचा, नवीन पुस्तके वाचल्याचा आनंदही मिळेल आणि त्या मुलांना पण न तुटलेली चांगली खेळणी मिळतील. मेधा आणि अंकुरला हे आपल्याला इतकी वर्षं का सुचले नाही याचे वाईट वाटले, आणि आपली लेक मोठी झाली याचा आनंददेखील झाला. अवनी समजून उमजून नाताळ साजरा करत होती. त्यामुळेच तिला मित्राच्या बोलण्याचा इतका राग आला होता.

“पण मला सांग आई, आपण फक्त आपल्याच धर्माचे सण साजरे केले पाहिजेत असं नाही ना, आता यास्मिन मॅमचंच उदाहरण घे, त्या दरवर्षी त्यांच्या मुलाला कृष्ण बनवतात जन्माष्टमीला किंवा मोनिका मॅम हिंदू मायथॉलॉजीचा अगदी अभ्यास करून मस्त नाटक बसवतात. त्या तर दर वर्षी आम्हांला तिळगूळसुद्धा देतात. मग प्रणवला असं का वाटलं असेल की मी करते ते चूक आहे?”

“अवनी, आपण आपल्याला पटतं म्हणून ते साजरे करतो. हो की नाही, मग तू पण प्रयत्न कर प्रणवला पटवून द्यायचा. मॅम म्हणाल्या तसं तू त्याला आपल्या घरी बोलाव आणि आपण हा सण कसा साजरा करतो ते दाखव. जेव्हा आपण ती पुस्तकं, खेळणी देतो तेव्हा तिथल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला बघू देत. ते बघून जर तो बदलला तर चांगलंच आहे की.”

अवनीने शांतपणे याचा विचार केला आणि त्याला एकट्याला बोलावण्याऐवजी बसमधल्या सगळ्यांनाच बोलवायचे ठरवले. यावर्षीचे डेकोरेशन करताना तिने जरा जास्तच मेहनत घेतली होती; आणि लेकीची तळमळ जाणून मेधानेही पार्टीची जोरदार तयारी केली होती. आधी प्रणवने येण्यासाठी आढेवेढे घेतले, मात्र सगळेच जाताहेत तर आपण एकटे पडू म्हणून मग तोही तयार झाला. 

सगळे जण घरी जमल्यावर अवनीने सगळ्यांना बसवून तिने सुरुवातीला छान गिफ्ट्स मिळतात म्हणून नाताळ साजरा करायला कशी सुरुवात केली ते सांगितले. तिने चार-पाच वर्षांपूर्वीपासून याच दिवशी ती पुस्तके, खेळणी डोनेट करायला कशी सुरुवात केली हे सांगितल्यावर तिच्या एक दोन मैत्रिणी तर म्हणाल्या, “कसली भन्नाट आयडिया आहे ही. आम्ही पण नेक्स्ट इयर पासून करू हे.”  पण अवनीचे सगळे लक्ष प्रणवच्या प्रतिक्रियेकडे होते. तो शांत बघत होता, काहीच बोलत नव्हता. 

जवळच्या एका वस्तीत ती पुस्तके आणि खेळणी घेऊन जाण्याआधी अवनीने त्यांच्याकडे काम करणाऱ्या अलकाताईंना विचारून त्यांच्या मुलीसाठी दोन पुस्तके बाजूला काढून ठेवली होती. घरे तर खूप होती, पण त्यामानाने खेळणी कमी होती म्हणून अवनीनेच मागच्या दोन वर्षांपासून तिथे खेळण्यांची लायब्ररी केली होती. एका आजींच्या घरात सगळी खेळणी ठेवलेली असायची. कोणी घरी घेऊन गेला तर आठवणीने दोन दिवसांनी परत आणून द्यायचा. 

“मग प्रणव अजूनही हे तुला चुकीचं वाटतं का?” अवनीने थेटच प्रश्न विचारला त्याला. 

“नाही, म्हणजे चूक नाही. पण मग नाताळच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या सणाला पण तू हे करूच शकतेस ना. माझं इतकंच म्हणणं आहे की आपण आपल्या सणांना फार महत्त्व देत नाही.” चाचरत तो म्हणाला.

“हे बघ, नाताळ डिसेंबरमध्ये येतो त्यामुळे मला सोयीचं आहे हे. आणि मला वाटतं सगळ्याच धर्माचे सण आनंद देण्यासाठी, घेण्यासाठी असतात.  वी आर द फ्यूचर, असं तूच परवा तुझ्या असेंब्लीच्या भाषणात म्हणाला होतास ना.” 

प्रणव गोंधळात पडला होता, हेसुद्धा अवनीच्या दृष्टीने निम्मी लढाई जिंकल्यासारखे होते. सगळे घरी आले तेव्हा घरी चक्क सांताक्लॉज अर्थात अवनीचे बाबा, त्यांची वाटच बघत होता. त्याने दिलेली चॉकलेटं खाऊन सगळे “हो हो हो” म्हणत होते, तेव्हा अवनीला जाणवले चक्क प्रणव पण “हो हो हो” म्हणत होता! 

-मानसी होळेहोन्नूर

***


My Cart
Empty Cart

Loading...