
अनेक शिक्षक ‘वयम्’ मासिकाचा वापर शैक्षणिक साहित्य किंवा मुलांशी चर्चा करणाचे साधन किंवा मुलांना वाचनाकडे वळवण्याचे माध्यम म्हणून वापरतात. ते कसे वापरले जाते, हे समजून घेण्यासाठी ही खास स्पर्धा आम्ही जूनमध्ये जाहीर केली होती. सुमारे ५० शिक्षकांनी त्यात सहभाग घेतला. धनवंती हर्डीकर आणि बसंती रॉय या नामवंत शिक्षणतज्ज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. ‘वयम्’च्या परंपरेप्रमाणे पहिला, दुसरा क्रमांक न काढता ‘बक्षीसपात्र ४’ जणांची निवड केली आहे. विजेत्यांचे अभिनंदन!
ऋचा पाटणकर
युवराज माने
संदीप मोहिते
नीता कांबळे
परीक्षकांचे मनोगत-
मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, रंजक आणि अद्ययावत माहिती, विचारांना चालना देणारे, अनुभवांची आणि कौशल्यांची कक्षा विस्तारत नेणारे खेळ, कृती आणि उपक्रम असे भरपूर साहित्य ‘वयम्’मध्ये दरमहा उपलब्ध होते. आपल्या संविधानातील मूल्ये, सकारात्मक जीवनकौशल्ये अशा निकषांवर पारखूनच या साहित्याचा समावेश केलेला दिसतो. मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येईल असे हे सुयोग्य साहित्य असल्यामुळे या स्पर्धेत शिक्षकांचे भरपूर वेगवेगळे अनुभव वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती, तिथे काहीशी निराशा झाली. विशेषतः वैज्ञानिक माहिती शालेय शिक्षणाशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांची उणीव तर खूपच जाणवली. ललित किंवा माहितीपूर्ण भागाचा उपयोग अवांतर वाचनापुरता मर्यादित राहतो आणि ‘उपक्रम’ या सदराखाली येणाऱ्या भागाचाच मुलांच्या ‘शिकण्यासाठी’ विचार केला जातो असे सर्वसाधारण चित्र दिसले.
मुलांच्या त्या त्या वेळच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन विचारपूर्वक ‘वयम्’मधील काही भागाची निवड ज्यांनी केली, त्या निवडीमागे कोणता विचार होता आणि त्या भागाचा प्रत्यक्ष उपयोग कसा केला, यानुसार विजेत्यांची निवड केली आहे. मुलांचे ‘शिकणे’ समृद्ध करण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रामाणिक अनुभवकथनातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, ही अपेक्षा.
-धनवंती हर्डीकर
हे अनुभवलेखन वाचल्यावर जाणवले की, काही शिक्षक सजगपणे विद्यार्थ्यांच्या समृद्धीकरणासाठी सतत प्रयत्नशील आहेत. वर्गअध्यापनाला ‘वयम्’ची जोड देण्यात ते प्रयत्नशील आहेत. मात्र ‘वयम्’चे शैक्षणिक मूल्य शिक्षकांना अधिक विस्तृतपणे मांडता आले असते.
-बसंती रॉय