Menu

सायफाय कथा स्पर्धा-2021

image 24
Feb

सायफाय कथा स्पर्धा निकाल २०२१

सायफाय कथा स्पर्धा- विजेत्यांचे अभिनंदन.

‘मी ‘पी’ बोलतोय’ हा श्रीराम शिधये यांच्या ‘वयम्’ एप्रिल २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर आधारित ‘सायफाय कथा स्पर्धा’ घेण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे ५० मुलांनी सहभाग घेतला. सर्व सहभागींचे कौतुक. सायफाय कथा करणे ही सोपी गोष्ट नाही, तरी ५० मुलांनी हा प्रयत्न केला, हे विशेष! या सायफाय कथा स्पर्धेचे परीक्षण डॉ. सावनी गोडबोले, डॉ. प्रसाद गोडबोले आणि श्रीराम शिधये यांनी केले.
पाच कथालेखकांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पाचजणांचे विशेष अभिनंदन!

सायफाय कथा स्पर्धा- उत्तम पाच-

  • शंतनू भालचंद्र आपटे- दहावी, सिटी इंटरनॅशनल स्कूल, सातारा रोड, पुणे.
  • खुशबू जयराज अंबादे, दहावी, दयानंद आर्या कन्या महाविद्यालय, नागपूर.
  • कबीर संतोष केसकर, सहावी, अक्षरनंदन, पुणे.
  • मैत्रेय मयुर आडकर, पाचवी, विद्यानिकेतन स्कूल- डोंबिवली.
  • श्रेया प्रशांत पाटील, नववी, विराज श्री राम सेंटेनियल स्कूल बोइसर, पालघर.

उल्लेखनीय तीन-

  • मुग्धा गणेश प्रभू, दहावी, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल-सांताक्रूझ, मुंबई.
  • धर्ती पारधी, सातवी, दयानंद आर्या कन्या महाविद्यालय- नागपूर.
  • यशश्री देवानंद चहांदे, दहावी, दयानंद आर्या कन्या महाविद्यालय, नागपूर.

परीक्षकांचे मनोगत

मराठीत ‘विज्ञानकथा’ हा विषय म्हणावा तितका लोकप्रिय झालेला दिसत नाही. बऱ्याच मंडळींना वाटणारी विज्ञानाची भीती ह्याला कारणीभूत असावी. पण विज्ञानाचा जन्म कुतूहलातून होत असतो. आणि ती तर सर्वच मुलांची सहज प्रवृत्ती! म्हणूनच ‘वयम्’ने ‘सायफाय कथा स्पर्धा’ आयोजित केली, तेव्हा खूप आनंद झाला.

‘हे असं का होतं?’, ‘अमुकतमुक खरंच झालं तर काय काय होईल?’ असे प्रश्न मुलांना सारखे पडत असतात आणि त्याला ती आपापल्या परीने उत्तरही शोधत असतात.

“असं का होतं?” ह्या प्रश्नाचे उत्तर देतात ते विज्ञान-लेख. शोधताना जन्माला येते ती विज्ञानकथा.

म्हणजे तुम्ही इंटरनेटवर “मंगळ ग्रह किती मोठा आहे?, त्याच्यावर सध्या काय काय संशोधन चालू आहे?” ह्या प्रश्नांची उत्तरे शोधलीत तर ती अचूक आणि सहज मिळतील. ती उत्तरे एकत्र लिहिलीत तर त्याचा विज्ञान-निबंध होईल. पण “समजा मंगळावर पाणी सापडले, तर काय होईल?” किंवा “जर माणसं मंगळावर राहायला गेली तर काय होईल?” ह्याची अचूक उत्तरे कोणालाच आज, आत्ता देता येणार नाहीत. त्याबद्दल आपण फक्त अंदाज करू शकतो. म्हणजे मंगळावर माणसे राहायला गेली तर ती पृथ्वीची आठवण काढत राहतील हेही शक्य आहे. आणि मंगळ ग्रहाची सुद्धा (पृथ्वीची लावली तशी) वाट लावतील हेही शक्य आहे. नेमके काय घडेल ते सांगता येणार नाही, कारण हे अजून घडलेले नाही.

याच शक्यतांचा शोध घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकाने तुम्हांला ‘विज्ञानकथा लिहा’ ह्या मोहीमेवर पाठवले होते. आम्हांला खात्री आहे की, तुम्हांलादेखील ही virtual मंगळ सफर खूप आवडली असणार. तशीच मजा आम्हांला तुमच्या विज्ञानकथा वाचताना आली.

परीक्षण करताना आम्ही ती मुळात कथा आहे, की नुसतीच माहिती आहे, ते पाहिले. ज्यांची कथा आहे त्यांनी ती रोचक (interesting) प्रकारे लिहिली आहे की नाही, ते पाहिले. मग, ती पटण्यासारखी आहे की नाही याचा विचार केला. (म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्‍या अचूक आहे का?) आणि मग भाषाशैली कशी आहे, हाही निकष मनात ठेवला.

आपण शाळेत ‘सूर्य उगवलाच नाही तर?’ वगैरे विषयांवर निबंध लिहितो, तेव्हा आपल्याला हे माहीत असतं की हे कधी घडणार नाही. म्हणून मग निबंधाच्या शेवटी आपल्याला ‘मी स्वप्नातून जागा झालो’ असे एखादे सारवासारवीचे वाक्य घालावे लागते. पण विज्ञानकथेत आपल्याला एक गंमत करता येते. म्हणजे ती घटना भविष्यकाळात घडत आहे, अशी कल्पना करता येते. म्हणजे ती आज नाही तर उद्या नक्की घडू शकते असे वाचणाऱ्याला वाटते.

उदा: The Fun They Had ही Isaac Asimov (१९५०) ह्या लेखकाची विज्ञानकथा. त्यात ‘घरच्या घरी शाळा’ ही कल्पना मांडलेली होती. ती लिहिली गेली तेव्हा वाचणाऱ्यांना ती अशक्यप्राय वाटली होती. पण तुम्ही मुले आत्ता ती प्रत्यक्षात अनुभवता आहात!

‘वयम्’ने आयोजित केलेल्या स्पर्धेत तुम्हांला फक्त मंगळावरच्या सृष्टीबद्दलच कथा लिहायची होती. सर्व स्पर्धकांनी एकाहून एक मस्त कल्पना लढवल्या आहेत. तुमच्या अचाट कल्पनाशक्तीने आम्ही थक्क झालो. प्राची वराड हिने मंगळावर झाडे उगवावीत यासाठी स्वतःचे मलमूत्र वापरून पाहिले. मुनीद्रा कदम हिने आपल्या वॉटरबॅगमधले पाणी उडवून मंगळावर आक्रमण करणाऱ्यांना ठार मारले होते. श्रेया पाटीलने मंगळावर जाऊन भूमिगत झाल्याची कल्पना केली आहे.

भाषाशैलीने मात्र आमची निराशा झाली. इंग्रजी कथांमधली इंग्रजी भाषा बरी होती, पण अनेकांचे मराठी मात्र हिंदीच्या वळणाचे आहे, हे जरा खटकले. ‘नजारा’, ‘उडती तशतरी’, ‘उबड खाबड जमीन’ हे शब्द मराठीतले नाहीत! सहज मनात आले, मंगळवासीयांचे आक्रमण पृथ्वीवर आपल्या हयातीत होणार नाही, पण मराठीवर इतर भाषांचं आक्रमण मात्र स्पष्ट दिसू लागलं आहे. ते होऊ नये असं वाटत असेल तर मुलांनी मराठी पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत.

स्पर्धेतील सगळ्याच विज्ञानकथा अगदी मस्त होत्या, असं म्हणता येणार नाही. पण एका वेगळ्या लेखन-प्रकाराशी तुम्ही अगदी सहज मैत्री केलीत, त्यावर तुम्हांला लिहावंसं वाटलं, ह्याचं खूप कौतुक वाटलं.

-डॉ. सावनी आणि डॉ. प्रसाद गोडबोले, पेण

My Cart
Empty Cart

Loading...