संपादकीय मार्च- तुमचे विचार महत्त्वाचे!
‘वयम्’ दोस्तांनो, दोन महत्त्वाच्या बातम्यांवर तुमच्याशी बोलायचं आहे; खरं तर तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. अलीकडे जाहीर झालेले दोन निर्णय तुम्हां मुलांशी निगडित आहेत. त्यामुळे तुमचे विचार महत्त्वाचे! पहिला म्हणजे- राज्यातील चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आदेश काढला आहे की, इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर भरवा. त्यापेक्षा लवकर नको. आपल्या राज्यपालांनी आधी हे मत मांडले होते. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ही राज्य सरकारची एक संस्था. या संस्थेने राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी, पालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय मागवले, त्यांचा अभ्यास केला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हांला हा निर्णय पटला का? तुम्ही त्यावर तुमच्या घरी, मित्र-मैत्रिणींमध्ये काय चर्चा केलीत? तुमचे स्वत:चे अनुभव काय आहेत? तुम्ही जेव्हा केजीते चौथी इयत्तांमध्ये होतात, तेव्हा तुमची शाळेची वेळ काय होती? तुम्हांला ती योग्य वाटायची का? शासनाने हा निर्णयघेताना जी कारणं सांगितली आहेत, त्यात म्हटलं आहे की, बरीचशी मुलं रात्री उशिरा झोपतात. शाळेसाठी लवकर उठावं लागलं, तर त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे ती शाळेत लक्ष देऊ शकत नाहीत, झोपाळलेली असतात. अनेक मुलांच्या शाळा घरापासून लांब असतात. अशांना आणखी लवकर उठून तयार व्हावं लागतं. लहान मुलांना किमान आठ-दहा तास सलग झोप मिळाली पाहिजे, तरच त्यांचं आरोग्य सुदृढ राहील. शाळेच्या वेळेमुळे त्यांची झोपमोड नको. मुलं लवकर झोपत नाहीतयाची कारणं अनेक आहेत-
१. मनोरंजनाच्या विविधसाधनांत रमल्यामुळे;
२. उशिरापर्यंत सुरूअसलेलं ध्वनिप्रदूषण- उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजवलं जाणारं कर्कश संगीत इ;
३. काहींचे पालक कामावरून रात्री उशिरा घरी येतात. खरोखरच किती घरांमध्ये दोन्ही पालक उशिरा कामावरून घरी परत येतात? एक पालक जरी वेळेत घरी आला तरी मुलांना वेळेत जेवायला देऊन ती लवकर झोपतील, हे बघता येऊ शकतं न? ज्यांचे पालक रात्री ७-८ पर्यंत घरी येतात, ती मुलं तरी साडेनऊ-दहाला झोपतात का? दुसरं कारण आपल्या हातात नाही. पण वाहनांच्या आवाजाचा त्रास सगळ्यांना असतो का? विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजवलं जाणारं संगीत कर्कश नसावं, ते रात्री १० वाजताबंद व्हावं, असा कायदा आहे. तो पाळला जावा, असा आग्रह प्रत्येक नागरिकाने धरला पाहिजे. जर कोणी तो पाळत नसेल तर आपण पोलीस स्टेशनला तक्रार करू शकतो, आणि पोलीस कारवाई करतात, हा माझा अनुभव आहे. अगदी स्वत:चं नाव गुप्त ठेवूनही आपण ही तक्रार करू शकतो. वय वर्षे ३ ते १०या वयातील मुलं मनोरंजनात जास्त वेळ रमण्यामुळे उशिरा झोपतात, हे मुळात योग्य वाटतंका तुम्हांला? लहान वयात अशी सवय लागणं चांगलं आहे का? नऊ, साडेनऊच्या आसपास शाळा असेल तर मुलांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागण्याची शक्यता आहे. हाही उल्लेख शासनाच्या आदेशात आहे. प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या भागांतील मुलं असतात. काही मुलांना तरी ट्रॅफिकमध्ये अडकावं लागू शकतं. ते टळावं म्हणून शाळेची वेळ ११, १२, १ अशी असावी का? काय वाटतं तुम्हांला? अनेक घरांत पालकांची कामावर जाण्याची वेळ बघून मुलांना उठावं लागू शकतं. काही मुलं पाळणाघरात राहतात. काहींना सकाळी आई-बाबा निघण्यापूर्वीएकत्र न्याहारी करावी, असं वाटू शकतं. त्यामुळे मुलांची सकाळी उठण्याची वेळ फक्त शाळेवर अवलंबून नाही. प्रत्येक घरातल्या परिस्थितीनुसार जी काही उठायची वेळ असेल त्यानुसार रात्री किती वाजता झोपायचं, किती वाजल्यानंतर स्क्रीन बघणं टाळायचं, मनोरंजनाची साधनं किती वाजल्यानंतर वापरायची नाहीत, असे काही नियम घरातल्या सर्वांनी मिळून करावे, असं तुम्हांला वाटतं का? योगायोग बघा, आपण हे बोलतोय त्या महिन्यात जागतिक ‘झोप दिन’ साजरा होतो. २१ मार्चला दिवस-रात्र दोन्ही १२-१२ तास, म्हणजे समान वेळ असतात. २१ मार्चच्या आधीचा शुक्रवार हा जागतिक ‘झोप दिन’. ‘झोप’ या नैसर्गिक क्रियेवर सध्या जगभर भरपूर अभ्यास सुरू आहे. आधुनिक जीवनशैलीने झोपेवर फार आक्रमण केलं आहे, याची चिंता जगात सर्वत्र व्यक्त होत आहे. आणि त्यामुळे त्यावर खूप संशोधन सुरू आहे. तुम्हांला स्वत:ला किती तासांची झोप मिळते? ती पुरेशी वाटतेका? वेळेत झोपण्यासाठी तुम्ही कोणते नियम पाळता? तुम्ही याबद्दल तुमचं मत कळवाल?
***
दुसरा निर्णय आहे कोचिंग क्लासच्या संदर्भात. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने कोचिंग क्लाससाठी नियमावली जाहीर केली आहे. वाचलीत का तुम्हीती? शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर पूर्ण नियमावली आहे. ती वाचा, फक्त बातम्या नको. त्यात स्पष्ट म्हटलंय की, १६ वर्षांखालील किंवा शालान्त परीक्षेपर्यंतच्या मुलांसाठी कोचिंग क्लासनकोच. नवीन शैक्षणिक धोरणानुसारजी शिक्षण पद्धत आणि मूल्यमापन पद्धत अपेक्षित आहे, त्यात दहावीपर्यंतच्या मुलांना क्लासलाजाण्याची गरजच नाही, असं यानं म्हटलंय. यावर तुमचं मत काय? शाळेत शिकवतात तेपुरेसं वाटत नाही का? शाळेचा अभ्यास, अधिक स्वत:चा अभ्यासइतकं केलं तर काय होईल? शाळेतले विषय शिकण्यासाठी तुम्हांला कोचिंग क्लासची गरज वाटते का? ही नियमावली खरोखर अमलात येऊन दहावीपर्यंतचे कोचिंग क्लास बंद झाले तर काय होईल, असं तुम्हांला वाटतं? ‘वयम्’चे वाचक विचारी आहेत, यावर आमचा विश्वास आहे. म्हणून या दोन्ही विषयांवर तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. आपण तुमची मतं संकलित करून ती शासनाकडे पाठवू या?
-शुभदा चौकर
cshubhada@gmail.com
स्पर्धेचे विषय-
१. तुम्हांला स्वत:ला किती तासांची झोप मिळते? ती पुरेशी वाटते का? वेळेत झोपण्यासाठी तुम्ही कोणते नियम पाळता? तुम्ही याबद्दल तुमचं मत कळवाल?
२. कोचिंग क्लास याबाबत तुमचं मत काय? शाळेत शिकवतात ते पुरेसं वाटत नाही का? शाळेचा अभ्यास, अधिक स्वत:चा अभ्यास इतकं केलं तर काय होईल? शाळेतले विषय शिकण्यासाठी तुम्हांला कोचिंग क्लासची गरज वाटते का? कोचिंग क्लास संदर्भातील नियमावली खरोखर अमलात येऊन दहावीपर्यंतचे कोचिंग क्लास बंद झाले तर काय होईल, असं तुम्हांला वाटतं?
वरील दोन विषयांपैकी एका किंवा दोन्ही विषयांवर तुझं मत २०० शब्दांत लिही आणि ahamawamwayam@gmail.com यावर तुझे विचार मराठी किंवा इंग्रजी भाषेत दिनांक ३१ मार्चपर्यंत पाठव. मेल करताना तुझं नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहायला विसरू नको. निवडक मतांना ‘वयम्’च्या सोशल मिडीयावर प्रसिद्धी दिली जाईल.
***