

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील लेख फक्त वयम् च्या बाळ मात्रासाठी
By Wayam Magazine, On 12th January 2021, Children Magazine
योद्धा संन्यासी!
१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.
एकदा संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुले डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेने एक नाग सरपटत जात असल्याचे एका मुलाने पाहिले. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलेही सापाला पाहून घाबरली. परंतु त्यातील एक मुलगा मात्र किंचितही हलला नाही. तो ध्यानात मग्न होता. मुलांनी त्याला हाका मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. मुलांनी धावत जाऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावले. एव्हाना त्या नागाने फणा पसरला होता. सारी मुले खिळून बसली होती. पण काही वेळातच तो साप सळसळत निघून गेला. हे सगळे ऐकल्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला, “मला नाग वगैरे काही कळलं नाही. मला कसला तरी खूप आनंद होत होता.”
वयाच्या सहाव्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला. पहिला दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याला या दिवशी पहाटे त्याच्या घरातील पुजारींनी काही पूजा, संस्कार करण्यासाठी बोलाविले होते. शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने हा विद्यारंभ होता. त्याची घरची सारी मंडळी उपस्थित होती. पुजारींनी काही मंत्र म्हटले. या नव्या विद्यार्थ्याला सरस्वतीच्या ठायी अर्पण केले. सरस्वती म्हणजे ज्ञानदेवता मानली जाते म्हणून! मग त्यांनी रामखडी नावाचा लालसर खडू त्याच्या उजव्या हातात ठेवला आणि त्याचे बोट धरून पाटीवर अक्षरे गिरविली. शाळेत जाताना त्याने नवे कोरे धोतर नेसले होते. बगलेत बैठकीची गुंडाळी होती. कमरेला लांब दोरी बांधलेली बोरूची लेखणी लोंबकळत होती. हे सर्व त्या मुलाला खूप छान वाटत होते. या मुलाची स्मरणशक्ती तीव्र होती. आईनेच त्याला ‘फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ या नावाचे पुस्तक शिकविले. जगात कितीही दु:ख, संकटे वाट्याला आली तरी नैतिक मूल्ये कधीही बाजूला टाकायची नाहीत हाही धडा तो आईकडूनच शिकला. आईने त्याला सांगितले होते, ‘आयुष्यभर पवित्र राहा. स्वत:चा सन्मान राखून राहा आणि इतरांच्या सन्मानालाही कधी ठेच पोहोचू देऊ नकोस. स्वभावाने शांत आणि मृदू हो. पण प्रसंगी कठोर हो.’
भीती, अंधश्रद्धा हे शब्द त्याच्या गावीच नव्हते. कंटाळा आला की, तो एका मित्राच्या घरी जायचा. त्याच्या अंगणात चाफ्याचे झाड होते. फांदीला लोंबकळून डोके खाली करून लटकण्याचा खेळ त्याला आवडायचा. एक दिवस तो तशाच पद्धतीने लटकत होता. घरातल्या आजोबांनी त्याचा आवाज ओळखला. हा मुलगा पडेल, या काळजीने आजोबांनी त्याला बोलाविले आणि ‘झाडावर चढून असे खेळ खेळू नकोस’ असे सांगितले. त्या मुलाने याचे कारण विचारले. तेव्हा आजोबा म्हणाले, ‘झाडावर ब्रह्मराक्षस राहतो. जे झाडावर चढतात त्यांची मान तो तोडून टाकतो.’ त्या मुलाने हे ऐकून घेतले. आजोबांना बरे वाटले. परंतु आजोबांची पाठ वळताच तो पुन्हा झाडावर चढला. बाकीच्या मुलांनी त्याला विचारले, “आजोबांनी सांगितलेले विसरलास का?” तो म्हणाला, “कुणी काही सांगितले म्हणून कधीही त्यावर विश्वास ठेवू नका. आजोबांनी सांगितलेले खरे असते तर माझी मान यापूर्वीच ब्रह्मराक्षसाने मोडून टाकली नसती का?”
तो खूप स्पष्ट विचारांचा होता. पुढे मोठ्या जनसमुदायासमोर बोलताना त्याने हेच सांगितले की, ‘तुम्ही पुस्तकात वाचले म्हणून कशावरही विश्वास ठेवू नका, सत्य काय आहे ते तुम्हीच शोधा.’