• साहित्यातील कोलंबस|Sahityatila kolambasa साहित्यातील कोलंबस|Sahityatila kolambasa

  साहित्यातील कोलंबस!

  By Pravin Dawane, On 27th Feb 2020, Children Magazine

  ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक

  आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब! कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.

  २७ फेब्रु १९१२ या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला व १० मार्च १९९९ रोजी त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. त्यांचा जन्मदिवस अतिशय कृतज्ञतापूर्वक ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. इतका मोठा सन्मान त्यांना दिला जातो, कारण त्यांनी मराठी साहित्यात नुसतीच मोलाची भर घातली म्हणून नव्हे, तर आपल्या मातृभाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून अविरत जनजागरण केलं. उपेक्षित वनवासी बांधवांची प्रत्यक्ष सेवा केली आणि असंख्य अनाम

  वंचितांचा ते आधार झाले. माझ्या मराठी मातीचा
  लावा ललाटास टिळा
  तिच्या संगाने जागल्या
  द-याखो-यातील शिळा

  अशा शब्दांत कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राचा गौरव केला. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. परंतु अवघ्या मराठी रसिकांनी त्यांना मानाने अभिवादन केले ते ‘विशाखा’ या संग्रहापासून. १९४२ साली म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ‘चले जाव!’ सारख्या स्वातंत्र्य-चळवळीच्या झंझावाताच्या प्रहरात ‘विशाखा’ एखाद्या पलित्यासारखी हाती आली. अवघ्या समाजावर या कवितांनी अक्षरशः गारुड केले. युवकांच्या धमन्यांतून राष्ट्रप्रेमाचे रसायन जागृत करण्याचे सामर्थ्य कुसुमाग्रजांच्या शब्दांत होते. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार’ ‘अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!’ असे आवाहन करीत या कवितेने अक्षरशः रान जागे केले. स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला सज्ज असलेल्या क्रांतिकारकांचा स्वर कुसुमाग्रजांच्या प्रत्येक शब्दातून पलित्यासारखा धगधगत होता. मराठी भाषेचे तेज या शब्दांत होतेच; पण त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी बलिदान करण्यास सज्ज असलेल्या योद्ध्यांचे तेजही या कवितेत होते. ‘विशाखा’मधील ‘क्रांतीचा जयजयकार’ कवितेतील अनेक ओळी ह्या जगण्याची सुभाषिते झाल्या. आधुनिक मराठीत जणू क्रांतिसूक्त ठरणा-या या ओळी पाहा: ‘मृत्युंजय आम्ही! आम्हांला कसले कारागार?’
  किंवा
  ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार..’
  किंवा
  ‘कशास आई, भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ
  रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!’ आता वाचतानाही स्फूर्तीचे रोमांच उभे राहतात, अशा त्यांच्या अनेक कविता याच वयात वाचायला हव्यात. त्यातला आवेग, गती, तेजोमय शब्दकळा जाणकारांकडून समजून घ्यायला हवी. आयुष्य शिखराकडे नेण्याचे अभूतपूर्व सामर्थ्य कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांत आहे. त्या संपूर्ण मिळवून पुन्हापुन्हा वाचणं, पाठ करणं हाही एक व्यक्तिमत्त्व विकासाचा उपक्रम होऊ शकेल. तुम्ही नक्की वाचाव्या, अशा काही कवितांचा उल्लेख करतो नि मग पुढे जाऊ या.

  ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘अहि-नकूल’, ‘आगगाडी व जमीन’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘सात’, ‘टिळकांच्या पुतळ्याजवळ’, ‘निळा पक्षी’, ‘मातीचे गायन’, ‘समिधाच सख्या या’, अशा अनेक कविता ग्रंथालयांतून मिळवून वाचा. मोठ्याने वाचा. उच्चारातून त्या शब्दांचे हुंकार समजून घ्या! मित्रांनो, असं समजू नका, की कुसुमाग्रजांच्या सर्वच कविता अशा वादळी, प्रखर विषयावरील आहेत. तप्त सूर्याप्रमाणे दिपवून टाकणा-या कवितांप्रमाणे शीतल चंद्रकोरीप्रमाणे शांत-कोवळ्या खूप कविता आपल्या ह्या तात्याआजोबांनी लिहिल्या आहेत. इतक्या हळुवार; की वाटतं तळहातावर पहाटेचं दवच! उदाहरण म्हणून फक्त काही ओळी देत आहे. आपल्यासारख्या उत्सुक बालमित्रांना जाणवेल, अरे, ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ लिहिणारी हीच का ती तरल लेखणी?
  पाहा –
  जमू लागलेले दव
  गवताच्या पातीवर
  भासते भू तारकांच्या
  आसवांनी ओलसर
  काढ सखे, गळ्यातील
  तुझे चांदण्याचे हात
  क्षितिजाच्या पलीकडे
  उभे दिवसाचे दूत
  (विशाखा कवितासंग्रह)
  किंवा
  सजल श्याम घन गर्जत आले बरसत आज तुषार
  आता जीवनमय संसार !
  (किनारा)
  ‘उष:कालचे प्रकाशमंडळ येता प्राचीवर
  निळे पाखरू त्यांतून कोणी अवतरले सुंदर’
  (किनारा)-(निळा पक्षी)
  ‘शिणलेल्या झाडापाशी
  चंद्रकोर आली,
  म्हणाली, जाळीत लपू का?
  झाड बोललं नाही
  चंद्रकोर मार्गस्थ झाली...’
  (मौन-मुक्तायन)
  अशी अनेक उदाहरणे देता येतील. एक कविता शोधताना आणखीही चार वाचता येतील. कुसुमाग्रजांचे साहित्य वाचणे हा समृद्ध करणारा अनुभव आहे आणि तो व्रतस्थ निष्ठेने प्यायला हवा. कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून समाज जागृत करणा-या व समर्पणाने आयुष्य शोषितांसाठी, उपेक्षित रुग्णांसाठी वेचणा-या महापुरुषांचे दर्शन घडवले. काही महामानवांचा नामोल्लेख करतो, ज्यांचे तपस्वी व्यक्तिमत्त्व कुसुमाग्रजांनी कवितेतून व्यक्त केले. नुसतेच व्यक्तिदर्शन घडवले नाही, तर आजच्या सामाजिक सुख-दु:खांविषयी, वाढत्या विषमतेविषयी, शोषणाच्या पाशवी वृत्तीविषयी त्यांनी थेट संवादी लिहिले.

  महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य साने गुरुजी, समाजयोगी बाबा आमटे असे महामानव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितेतून साकारले गेले; आणि त्यातून मराठी कवितेला व्यक्तिपर असूनही समाजपर झालेल्या कवितांचे परिमाण लाभले. ‘रसयात्रा’ ‘मुक्तायन’, ‘प्रवासी पक्षी’ असे काही त्यांचे कवितासंग्रह मिळवून वाचा. यातल्या अनेक कविता तुम्हांला तेथे मिळतील.

  वि.वा.शिरवाडकरांची लेखणी कवितेप्रमाणेच नाट्यलेखनातही मनापासून रमली. त्यांनी आपल्या नाटकांतून मानवी मनाच्या अतर्क्यतेचे, अथांगतेचे दर्शन घडवले. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे ‘माझ्या नाटकात माणसाचं मन हाच मुख्य विषय असतो.’ असं मानवी मन उलगडणारी- ‘दूरचे दिवे’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’ ही आणि अनेक नाटके. शेक्सपिअरच्या नाटकांचे त्यांनी केलेले अनुवाद, स्वतंत्र निर्मितीइतकेच प्रभावी ठरले. राजमुकुटम (मॅक्वेथ), ऑथेल्लो - अशी काही अनुवादित नाटके भाषेचा डौल आणि अनुवादातील परिणामकारकता यासाठी जरूर वाचायला हवीत. परंतु त्यांच्या लेखणीने सोन्याचा कळस चढवला तो -‘नटसम्राट’ या नाटकाने. डॉ. श्रीराम लागू आणि दत्ता भट ह्या दोन थोर नटवर्यांप्रमाणे अनेक नामवंत अभिनेत्यांनी ‘गणपतराव बेलवलकर’ ही केंद्रस्थानी असणारी व्यक्तिरेखा साकार केली. तुमच्या पिढीला ‘नटसम्राट’ या शिरवाडकरांच्या नाटकाची ओळख झाली ती चित्रपटामुळे. नाना पाटेकर यांच्यासारख्या कसदार अभिनेत्याने-गणपतराव बेलवलकर-अर्थात नटसम्राट –प्रभावी उभा करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले. एका अतिशय यशस्वी नटाची त्याच्या घरातच, त्याच्या उतारवयात जी उपेक्षा होते, दोन पिढ्यांचा-सामाजिक-भावनिक जो संघर्ष निर्माण होतो, तो ‘नटसम्राट’मधून अनेक नाट्यमय घटनांतून साकार झाला आहे. ‘नटाचे’ नाटक असल्याने अनेक स्वगते, मुक्तकाव्ये यातून ‘कुसुमाग्रजांचे’ दर्शन ओघानेच घडते. एक नाटककार आणि एक श्रेष्ठ कवी यांच्यातील प्रतिभासंगम अभ्यासक आणि आस्वादक म्हणून आपण अनुभवायला हवा. अगदी काही वाक्यांचे नमुने पाहा:
  जगावं कि मरावं
  हा एकच सवाल आहे
  या दुनियेच्या उकिरड्यावर
  खरकटया पत्रावळीचा तुकडा होऊन
  जगावं बेशरम, लाचार आनंदानं
  की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?
  खरं सांगतो बाबांनो
  तुफानाला तुफानपणच नडतं आहे.
  कुणी घर देता का घर !
  तुफानाला महाल नको
  राजवाड्याचा सेट नको
  पदवी नको, हार नको
  थैलीमधली भेट नको
  एक हवं लहान घर,
  पंख मिटून पडण्यासाठी
  एक हवी आरामखुर्ची,
  तुफानाला बसण्यासाठी!
  आणि विसरू नका बाबांनो,
  एक तुळशी वृंदावन हवं
  मागच्या अंगणात..
  सरकारसाठी!
  कुसुमाग्रजांच्या अशा अनेक आशयघन शब्दावलींची उदाहरणे देता येतील. एकदा नव्हे, पुन्हा पुन्हा वाचून त्यातला विचार समजून घेणं ही सुद्धा एक जीवन समृद्ध करण्याची साधना आहे. अशा थोर कवीला, साहित्यिकाला जवळून बघण्याची, सहवासाची संधी मला मिळाली. अतिशय साधी व सात्विक रहाणी, स्वभावातील लीनता, समाजातील सर्वच घटकांवर मनापासून प्रेम करणारी त्यांच्यातील करुणा यांचा अनुभव घेतला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या गुणांमुळे त्यांची थोरवी अधिकच जाणवली. समाजातील तरुण पिढीवर त्यांची विशेष माया होती. मराठी भाषेची त्यांना गोडी लागावी म्हणून त्यांच्या अखेरच्या काळात जोडाक्षरविरहीत सुबोध काव्यरचना त्यांनी केल्या. स्वत:च्या निवासातील काही भाग त्यांनी बालवाचनालयासाठी दिला. चित्रकलेपासून अनेक कलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले. ‘वयम्’ पिढी घडावी म्हणून त्यांनी वेळोवेळी शासनाकडेही काही मतांचा आग्रह धरला.
  आडनावाने शिरवाडकर असलेले तात्यासाहेब सर्वार्थाने नाशिककर होते. महाराष्ट्राने त्यांना प्रेम दिलेच; पण नाशिकने त्यांच्यावर अपार माया केली. ते म्हणतात - ‘मी जन्मानं पुणेकर, नावानं शिरवाडकर- पण वास्तव्यानं आणि अंत:करणानं सर्वस्वी नाशिककर.’! नाशिकला जेव्हा नवे नाtट्यगृह बांधून झाले तेव्हा नाशिककर जनतेने आग्रह धरला की, या वास्तूला शिरवाडकरांचे नाव द्यावे. पण या संतवृत्तीच्या विनम्र साहित्यिकाने या प्रस्तावाला नकार देत म्हटले – ““मी अधिक योग्य नाव सुचवतो; महाकवी कालीदास नाट्यगृह असे नाव द्या !” खरंच, असा थोर माणूस होणं कठीण. आपले आवडते पु.ल. म्हणायचे, “महाराष्ट्रात वाकून नमस्कार करण्यासारखे दोनच पाय आहेत. ते म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे.” त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रु. हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हा मराठी भाषेचा गौरव म्हणता येईल. अवघ्या जगाने त्यांना मानाचा मुजरा म्हणून अवकाशातील एका ता-याचे ‘कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले. त्यांचे साहित्य वाचणे, मातृभाषेवर नि:स्सीम प्रेम करणे व समृद्ध, सुशील माणूस होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. ‘आम्हा घरी आहे शब्दांचेच धन, शब्द देता घेता झाले आहे आता शब्दांचेच मन’ या ओळीतच त्यांचे शब्दरूप अस्तित्व जाणवत राहाते. ‘प्रेम हाच संस्कृतीचा सारांश’ असं मानणा-या व जगणा-या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्यासारखी युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कार्यातून अजरामर असतात - तेच म्हणतात ना -
  तुम्ही जेव्हा
  माझ्या कवितेशी बोलता
  तेव्हा माझ्याशी बोलू नका,
  कारण माझ्या कवितेत
  मी असेन बराचसा
  बहुधा,
  पण माझ्या बोलण्यात मात्र
  तुम्हीच असाल
  पुष्कळदा.
  अशा वाचक रसिकांशी, मराठी भाषेशी एकरूप झालेल्या महाकवीला हा मानाचा मुजरा !

  -प्रवीण दवणे
  dilkhulass@rediffmail.com
  बॉक्स
  ‘कणा’सारख्या संवादी कवितेतून जगण्याच्या संघर्षाचेच पंख करणा-या आजच्या तरुणाईचे कणेदार मन त्यांनी मांडले. महापुरात नवा संसार वाहून गेला, भिंत खचली... चूल विझली, पण मन खचले नाही, जिद्धीची मशाल विझली नाही अशा गरुडपंखी वृत्तीचा तरुण आपल्या गुरुजींना म्हणतो -
  खिशाकडे हात जाताच; हसत हसत उठला.
  ‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
  मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा
  पाठीवरती हात ठेवून ‘नुसतं लढ म्हणा!’

  फेब्रुवारी २०१८

 • साहित्यातील कोलंबस|Sahityatila kolambasa

  हिरवाईत लपलेली रंगीत दुनिया

  On 24th July 2020, Children Magazine

  पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून!'वयम्' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-

 • patang

  रात्री उडणारे ‘पतंग'

  On 21st July 2020, Children Magazine

  दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये 'वयम्' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात 'पतंगां'वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय 'पतंग' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय

 • khamang

  खमंग सुगंध मातीचा!

  On 17th July 2020, Children Magazine

  गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत.

  पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो.

 • थेंबू आला भेटीला

  On 14th July 2020, Children Magazine

  गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.

  मित्रांनो, मी आलोSSS मी... पावसाचा थेंब!

 • पाठ्यपुस्तकांचा इतिहास!

  On 7th July 2020, Children Magazine

  काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... 'वयम्' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.

  'नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी 'नवं पुस्तक' म्हणजे 'पाठ्यपुस्तक'च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं!

 • ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'

  On 4th July 2020, Children Magazine

  यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. ती वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!' “स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’

 • ‘वयम्’च्या अनुभव लेख उपक्रमावर आधारित शैक्षणिक लेख, आज 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपदकीय पानावर

  On 19th June 2020, Children Magazine

  पाठ घेण्यापेक्षा पाठबळ द्या !

  सध्या मुलांच्या शाळा निदान ऑनलाइन पद्धतीने सुरू व्हाव्या, असा अट्टहासी सूर आळवला जात आहे. करोना-काळात जणू मुलांचे शिक्षण थबकले आहे आणि शिक्षण-विरहित पोकळीत ती जगत आहेत, अशी चिंता काहींना वाटत आहे. खरोखरच अशी स्थिती आहे का? प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी मुलांचे शिकणे बंद पडले आहे का? या काळात अनेक मुलांनी नव्या क्षमता कमावल्या, नवी कौशल्ये आत्मसात केली, त्यांना नव्या जाणिवा झाल्या- ही शक्यता आपण लक्षात का घेत नाही?

  येनकेन प्रकारे शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ मुलांसमोर सादर केले तरच शिक्षण होते, या गृहीतकापलीकडे आपण शिक्षणाचा विचार केला तर नव्या शक्यता लक्षात येऊ शकतात. अगदी पाठ्यपुस्तक या महत्त्वाच्या व मूलभूत शिक्षण-साधनाला प्रमाण मानूनही मुलांना शिकण्यासाठी चालना देण्याच्या अनेक नव्या शक्यता आपण या काळात आजमावू शकतो.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 16

  On 12th June 2020, Children Magazine

  तीव्र संवेदनशीलता

  नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

  आज वाचा भाग- 16.

 • शिस्तशीर मुलांना सलाम!

  On 8th June 2020, Children Magazine

  संयमाची रुजवण

  मुलांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळण्याची सवय बहुतांश घरांतून लागलेली असते. लॉकडाउनमुळे त्यांना जाणीव झाली की, आपल्याला जे जे हवेसे वाटतेय ते आत्ता मिळू शकणार नाही. आहे त्यात समाधान मिळवावे लागेल. कौतुक हे, की मुलांनी हाही धडा आनंदाने आत्मसात केला या काळात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुले लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

  आज वाचा भाग- 15.

 • शिस्तशीर मुलांना सलाम!

  On 2nd June 2020, Children Magazine

  शिस्तशीर मुलांना सलाम!

  “आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत?

  आज वाचा भाग- 14.

 • बेगमीचा काळ !

  On 27th May 2020, Children Magazine

  बेगमीचा काळ !

  करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!!

  …‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

  आज वाचा भाग- 13.

 • घरोघरी छोटे शेफ!

  On 22nd May 2020, Children Magazine

  घरोघरी छोटे शेफ!

  स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय!

  आज वाचा भाग- 12.

 • निवांत काळातील निरीक्षण

  On 20th May 2020, Children Magazine

  एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. आज वाचा भाग- 11.

 • बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन

  On 19th May 2020, Children Magazine

  बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन
  श्री. हेमंत मोने

  शुक्रवार दि. 22 मे 20 रोजी सायंकाळी पश्चिमेकडे बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे एकमेकांजवळ दर्शन होईल. त्या दिवशी संध्याकाळी 7.10 वा. सूर्यास्त होईल.शुक्र खूपच तेजस्वी असल्यामुळे सुर्यास्तानंतर 5—10 मिनिटांतच दिसू लागेल. त्यानंतर 7.35 चे सुमारास संधिप्रकाशाचा प्रभाव कमी होईल आणि मग शुक्राच्या डाव्या हातास (दक्षिणेस ) सुमारे एक अंशावर बुध ग्रह व्यवस्थित दिसेल. या दोन ग्रहांची युती मृग नक्षत्रात होत आहे.मृगातील काक्षी (Betalguse ) हा लाल तारा, सारथी तारका पुंजातील अग्नी (Elnath) व रोहिणी (Aldeberan) यांच्या त्रिकोणात शुक्र आणि बुधाचा मुक्काम असेल.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 10

  On 15th May 2020, Children Magazine

  विस्मृतीतील कलांची ओढ !

  मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

  आज वाचा भाग- 10.

 • तीन ग्रहांचे दर्शन

  On 12th May 2020, Children Magazine

  ‘वयम’ वाचकांनो, पहाटे उठून जरा आकाशात बघा. गुरु, शनी व मंगळ सध्या आपल्याला सहजपणे दर्शन देत आहेत. पहाटे 5 चे सुमारास एकाच वेळी आकाशात तीन ग्रहांचे सुंदर दर्शन होते आहे. त्यासाठी द्विनेत्री, दुर्बिण अशा कोणत्याही साधनाची जरुरी नाही. आपले डोळे त्यासाठी समर्थ आहेत. आता हे ग्रह कसे पहायचे ते सांगतो. पहाटे 5 ते 5.30 ही वेळ सर्वात उत्तम. दक्षीणेकडे तोंड करा. तुमच्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे (पश्चिमेक्डून पूर्वेकडे ) क्रमाने गुरु, शनी व मंगळ यांचे दर्शन होईल. गुरु या तिघांमध्ये तेजस्वी आहे. गुरु—शनी एकाच नजरेत येतात. या दोघांपासून मंगळ डाव्या हातास (पूर्वेकडे) थोडा दूर आहे. मंगळवाऱ दि. 12 ते शनिवार दि.16 पर्यंत निरीक्षण केल्यास आकाश दर्शनाबरोबरच चंद्राचे सरकणेही लक्षात येईल. या काळात ग्रहांच्या स्थितीत लक्षात येण्यासारखा कोणताच बदल होणार नाही. मंगळवाऱ दि. 12 च्या पहाटे चंद्राजवळ गुरु व शनी सहज ओळखता येतील. बुधवार दि. 13 रोजी चंद्र शनीच्या जवळ पोहोचलेला असेल. गुरुवार दि.15 रोजी चंद्र मंगळाला भेटेल. शुक्रवार दि. १६ रोजी चंद्राच्या रेषेत उजवीकडे (पश्चिमेस) अनुक्रमे मंगळ, शनी आणि गुरु यांचे सुरम्य दर्शन होईल.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 9

  On 12th May 2020, Children Magazine

  घरच्या घरी, कित्तीतरी! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 9 मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा भाग- 9.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 8

  On 7th May 2020, Children Magazine

  घरच्या घरी, कित्तीतरी! घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 7

  On 5th May 2020, Children Magazine

  मदत घेण्याची कला!

  अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5

  On 28th April 2020, Children Magazine

  मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 4

  On 22nd April 2020, Children Magazine

  वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 3

  On 20th April 2020, Children Magazine

  वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 2

  On 14th April 2020, Children Magazine

  करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 1

  On 9th April 2020, Children Magazine

  घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे.

 • शंकू ते मेंदू – आपला रंगप्रवास

  On 12th March 2020, Children Magazine

  इंट्रो - मानवी डोळ्यांना रंग नेमके कसे ओळखता येतात, यावर आतापर्यंत बरीच संशोधने झाली आहेत. काही संशोधने चालू आहेत. त्या संशोधनांतून कितीतरी रंगतदार शोध लागले आहेत... आपल्या जीवनात रंगच नसते, सगळं काही काळं-पांढरं असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं, नाही का ! नशीब, आपल्या सभोवतालीच निसर्गानेच किती रंगांची लयलूट केली आहे. सरत्या पावसाच्या संध्याकाळी आभाळात दिसणारी इंद्रधनूची कमान त्यावरील ता ना पि हि नि पा जा किंवा VIBGYOR आपण आनंदाने पाहू शकतो कारण आपले डोळे आणि त्यांना आज्ञा देणारा मेंदू !

 • नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही!

  On 11th March 2020, Children Magazine

  रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त - रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते.

 • रंगांची बेरीज-वजाबाकी

  On 10th March 2020, Children Magazine

  सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख - “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.

 • अग्नि-उत्सव!

  On 9th March 2020, Children Magazine

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी.

 • प्राण्या तुझा रंग कसा ?

  On 4th March 2020, Children Magazine

  इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का?
  प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात.

 • रंगांची ओळख

  On 3rd March 2020, Children Magazine

  इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.

 • सत्याचा शोध

  On 28th Feb 2020, Children Magazine

  मित्रांनो, आपल्या सार्‍या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.