
स्पीकर शाळा
मुख्याध्यापक शांताराम बारगजे यांनी शिक्षण खात्याकडून आलेलं परिपत्रक नजरेखालून घातलं. १५ जून २०२० पासून सर्व शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात करावी, असं त्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा २२ मार्च २०२० पासून बंद होत्या. आपल्या शाळेतील मुलांना ऑनलाइन शिकवणं सुरू करायचं असेल तर कोणत्या अडचणी येतील व त्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासंबंधी आपल्या शाळेतील शिक्षकांची मतं जाणून घ्यावी, म्हणून मुख्याध्यापक बारगजे यांनी सर्व शिक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांवरून मुख्याध्यापक बारगजे यांनी नजर फिरवली. सर्व शिक्षक सुरक्षित अंतर राखून बसलेले आहेत, याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी शिक्षकांना परिपत्रक वाचून दाखवलं. ते म्हणाले, “ऑनलाइन शिकवण्यात काही अडचणी येतील व त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, त्याबाबत तुमची मतं जाणून घेण्यासाठी मी ही बैठक बोलवली आहे.”