• वाचा किशोरवयीन मुलांचा मासिकातली गोष्ट - खोटी गोष्ट

  By Wayam Magazine, On 12th April 2021, Children Magazine

  इंट्रो- दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच! का, कशासाठी? ते नाही सांगता येणार! पण दोन्ही वेळेला मला काय वाटलं ते मात्र तुम्हाला मनापासून माझ्या मनातलं खरं खरं सांगणारी ही गोष्ट! ))))))))))))) ‘लक्ष आहे का वेळेकडे?’ बाबा म्हणाले, तेव्हा मी पुस्तकातून वर पाहिलं. पावणेदहा झाले होते. शाळा पावणेअकराची असायची, त्यामुळे आंघोळ स्किप केली, तर अजून पंधराएक मिनिटं वाचत बसणं शक्य होतं. पण ते बाबांना कसं सांगणार? “अं, हो, उठतोच”, मी पुटपुटलो आणि वाचत राहिलो. मला आशा होती, की सल्ला देऊन ते पटकन उठतील आणि बाहेर पडतील. ड्रायव्हर मघाशीच येऊन थांबलेला होता आणि त्यांची नेहमीची निघायची वेळ होऊन आता अर्धा तास तरी झाला होता. पण ते उठले नाहीत. पलीकडेच पडलेला ‘इंडीअन एक्स्प्रेस’ त्यांनी उचलला, उघडला, मग पुन्हा बंद केला. मग म्हणाले, “आंघोळ तरी झालीय का तुझी?” आता काही सुटका दिसत नव्हती. मी मधे बोट घालून पुस्तक मिटलं आणि म्हणालो, “नाही, पण हे वाचायला लागणार. शाळेमध्ये लास्ट पिरीअडला इन्स्पेक्शन आहे, तेव्हा मला सगळ्यांसमोर एक स्टोरी सांगायचीय. म्हणून काहीतरी वाचतोय !” वाक्य तोंडातून बाहेर येईपर्यंत, ते तसं येणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. खरं म्हणजे त्या दिवशी इन्स्पेक्शन बिन्स्पेक्शन काही नव्हतं आणि असतं, तरी इन्स्पेक्शनला मुलांना गोष्टी सांगायला कशाला लावतील? अगदी चौथीचा वर्ग असला म्हणून काय झालं! दोन सेकंद बाबा तसेच माझ्याकडे बघत राहिले. त्यांना तसं बघताना पाहून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आपण खोटं बोललो. माझ्या आठवणीत मी याआधी कधीही खोटं बोललेलो नव्हतो. हं, आता माझ्या क्लासमेट्सकडून त्यांनी कुणाला कशा थापा मारल्या याच्या गमती ऐकायला मिळायच्या आणि गोष्टीच्या पुस्तकांमधूनही खोटं बोलणारी कॅरेक्टर्स भेटायचीच. सिनेमातही. आता ती काही सगळी वाईट नसायची. बरेचदा हिरो मंडळीही थापाथापी करायची. पण ते वेगळं, आणि स्वत: खोटं बोलणं वेगळं. तेही असं सोप्पेपणाने, जराही न अडखळता. हे टॅलेंट माझ्यात असल्याचं माझ्या आजपर्यंत लक्षातच आलं नव्हतं आणि खोटं तरी मी का बोललो होतो? फक्त आणखी पाच-दहा मिनिटं वाचत बसता यावं म्हणून? एवढं कारण पुरेसं होतं? हा सगळा विचार माझ्या डोक्यात चालला होता, तोवर बाबा माझ्याकडे पाहातच होते. ‘मी सफाईने खोटं बोलल्याबद्दल स्वत:ला थोड्या घाईनेच कॉन्ग्रॅच्युलेट केलं का?’ असं मला वाटून गेलं. मी सहज खोटं बोललो असं मला स्वत:ला वाटलं असेल, पण त्यांना ते पटलंय का नाही हे आपल्याला कुठे कळलंय? त्यांना तसं बघताना पाहून पुढे काय करायचं, हे माझं ठरेना. आधीचं खरं वाटावं म्हणून थोडं जास्त बोलण्याची गरज होती का? पण जास्त बोलण्यामुळेच खोटं बोलतोय असं वाटायला लागलं तर काय करणार? मग मी गप्पच राहिलो. ते उठले, माझ्या जवळ आले, माझ्या हातातलं पुस्तक काढून घेतलं. आता मला जोरदार धपाटा पडणार अशी माझ्या मनाची खात्री झाली. मी डोळे मिटून घेतले. बाबा तसे मला मारत नसत. तसे म्हणजे नाहीच. मला तर त्यांनी कधी ओरडल्याचंही आठवत नव्हतं. पण आजवर ओरडलं, मारलं नाही, म्हणजे यानंतरही ओरडणार, मारणार नाहीत असं थोडंच आहे? असल्या हॉरर स्टोरीजही मी मित्रांकडून ऐकलेल्या होत्याच. पण बाबांचा काहीच आवाज आला नाही आणि पाठीवर धपकाही बसला नाही. मी डोळे उघडून पाहिलं, तर बाबा माझ्या हातातलं पुस्तक चाळत बसले होते. ‘नील गायमन?’ त्यांनी चष्मा काढून हातात घेतला. ‘याची गोष्ट सांगणार तू सगळ्यांसमोर उभा राहून? कॉम्प्लिकेटेड असतात त्याच्या गोष्टी. सांगायला सोप्या नाहीत आणि लांबीनेही मोठ्या असतात.’ मी काहीतरी पुटपुटलो. त्यांनी नीटसं ऐकलं की नाही कुणास ठाऊक. आणि खरं म्हणजे मलाही मी काय बोललो हे नक्की कळलं नाही. ते म्हणत होते ते बरोबरच होतं. मी गायमनचं पुस्तक वाचत होतो, कारण तो लेखक मला आवडायचा म्हणून. शाळेच्या लायब्ररीतून पुस्तक नुकतंच घेऊन आलो होतो म्हणून, गोष्ट सांगायचीय म्हणून नाही. मी विचार करून आणखी काहीतरी बोलणार इतक्यात बाबा उठले आणि त्यांनी वरच्या शेल्फवरून दुसरं एक पुस्तक काढलं. रे ब्रॅडबरी नावाच्या लेखकाचं, ‘ऑक्टोबर कन्ट्री’ नावाचं. लेखकाचं नाव माझ्यासाठी नवीन होतं. बाबांनी फरफर पानं उलटली आणि इंडेक्स बघून अमुक गोष्ट वाच असं सांगितलं. गोष्ट लहानशी होती. पाच मिन्टात वाचून होण्यातली. मी बरं म्हंटलं. मग म्हणाले, “आता आधी अंघोळ कर आणि पळ शाळेत . गोष्ट मधल्या सुटीत वाच”, मी मान डोलावली, आणि ते गेले. मी चूपचाप उठलो, अंघोळीला गेलो, आणि मग शाळेत. इन्स्पेक्शन अर्थातच नव्हतं. त्यामुळे पुस्तक वाचायचीही घाई नव्हती. पण थोडी भीती होती, की संध्याकाळी बाबा गोष्ट कशी सांगितली हे विचारतील, आणि आपल्याला काहीतरी रचून सांगायला लागेल. सकाळी बोललो तेव्हा पटकन तोंडातून बाहेर पडलं, विचारसुद्धा करायला लागला नाही, पण आता आपल्याला खोटं बोलावं लागणार हे माहीत आहे, तर वेळ आल्यावर आपण ते बोलू शकू का ? आणि समजा म्हणाले, कशी सांगितलीस ते करून दाखव, मग? मग काय करायचं? शाळेचा पहिला पिरीअड मॅथ्सचा होता, पाटील सरांचा. गणित हा एरवी माझा आवडीचा विषय, पण आज काहीतर झालंच होतं. माझं बिलकूल लक्ष लागेना. वर्गात काही प्रश्न विचारला, की पाटील सर हटकून माझ्याकडे बघत, माझा हात वरच असायचा. पण आज दोन- तीनदा असं झालं, की त्यांनी काय विचारलं, हेच माझ्या डोक्यात शिरेना. त्यांनी पाहिलं, की मी नजर चुकवायचो. खाली पाहायचो, किंवा कंपास बॉक्समधून काहीतरी काढल्या-ठेवल्याचं नाटक करायचो. क्लास संपला तेव्हा मला वाटलं, त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना सांगावं की पुन्हा असं होणार नाही. आज माझं लक्ष नव्हतं, कारण ....पण कारण काय सांगणार ? आणि कारण होतं तरी काय ? मी खोटं बोललो हे माझ्या डोक्यात अडकून बसलं होतं, की मी पकडला जाईन हे ? आणि दोन्हीमधे अधिक वाईट काय ? खोटं बोलणं, की पकडलं जाणं ? मधली सुट्टी झाली, तेव्हा मी पुस्तक काढलं, आणि बाबांनी सांगितलेली गोष्ट वाचून काढली. गोष्ट काही मुलांची नव्हती, मोठ्यांचीच होती. पण मी तसा अलीकडे मोठ्यांच्या बऱ्याच गोष्टी वाचत असे, त्यामुळे मला सवय होती. क्लासमधले बाकीचे फार कुणी काहीच वाचत नसत. म्हणजे अगदी सिलॅबसमधे लावल्यासारखी असणारी हॅरी पॉटर टाईप पुस्तकं सोडून. काहीजण त्याचेही फक्त पिक्चर बघून नॉव्हेल्स वाचल्याचं दडपूनच सांगायची असा मला संशय होता. पण ते राहू दे. मला सांगा, सगळ्यांनीच काय हॅरी पॉटर, नाहीतर मेझ रनर वाचायचं ? त्यापेक्षा ही गोष्ट छान होती, आणि कुणाला कळायला फार कठीण गेली असती असंही मला वाटलं नाही. ती गोष्ट मला आवडली या आनंदात मी शाळा सुटेपर्यंत होतो. पण शाळा सुटली आणि मला टेन्शनच आलं. बाबा मला समोर उभं करून विचारणार आणि मला खरंखुरं सांगून टाकायला लागणार अशी माझी खात्रीच पटली. मी घरी पोचलो, आणि चहा पिऊन तडक खाली खेळायला जाण्याऐवजी ती गोष्टच काढून बसलो. समजा मला ही सांगायची असती तर मी कशी सांगितली असती ? इंग्लिशमधून का मराठीतून, सगळीच सांगितली असती का काही भाग गाळला असता, नावं मनाची घातली असती का तीच ठेवली असती, ब्रॅडबरीचं नाव सांगितलं असतं, का अशीच मी कधीतरी वाचलेली गोष्ट असं सांगितलं असतं, एक ना दोन, आता मला खूपच प्रश्न पडायला लागले. मग मी सगळ्यांची उत्तरं काळजीपूर्वक शोधायला लागलो. बाबांनी विचारल्यावर मला हे सगळं माहीत असावंच लागलं असतं. बोलताना जरा काही गोंधळ झाला असता तर मी खोटं बोललो हे त्यांना कळलं असतं. आता हेही शक्य होतं की त्यांनी माझ्या खोटं बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असतं. तशीही मोठी माणसं चिकार खोटं बोलतात असं मी वाचलेली पुस्तकं, पाहिलेला टीव्ही आणि सिनेमा यावरून सांगू शकतो, शिवाय मी काही एवढा लहान नव्हतो, की खोटं बोलणं मला माहीतच असू नये, किंवा जमूच नये, तरीही, त्यांना काय वाटेल हे मला कसं सांगता येणार ? त्या दिवशी बाबांना यायला बराच उशीर झाला. नेहमी मी साडेनऊ-दहालाच झोपायचो, पण त्या दिवशी झोप येतंही नव्हती म्हणून मी आपला जागाच होतो. अकरा वाजले, साडेअकरा, बारा... आईही झोपून गेली असावी. शेवटी जेव्हा लॅचकीचा आवाज आला, तेव्हा एक वाजून गेला होता. आणि मी जागाच. त्यातल्या त्यात एक बरं झालं, की त्यांना मी झोपलोयसं वाटल्याने काही बोलणच झालं नाही. पण मग मला वाटायला लागलं की मी जागा आहे हे त्यांना कळलं असतं, आणि तरीही त्यांनी मला विचारलच नसतं तर? अधिक वाईट काय ? मला त्यांना उत्तर द्यायला लागणं, की त्यांनी मला विचारायचंच विसरून जाणं ? पण शेवटी तेच झालं. त्यांनी मला काही विचारलं नाही, आणि मी त्यांना काही सांगितलं नाही. दिवस जायला लागले आणि आधी मला जी भीती वाटायची ती नंतर नंतर कमी होत गेली. मग वाटायला लागलं, की त्यात काय झालं, आपणच त्यांना सांगून टाकूया. असं सांगून टाकणं, आता फार कठीण वाटेना. मला वाटतं गोष्ट जशी जुनी होते, तशी ती सोपी व्हायला लागते. नव्या टीचरबद्दल वाटणारी भीती तो सवयीचा झाल्यावर पुसली जायला लागते तसं बाकी गोष्टींचंही होतच असणार. याचंही तसच झालं. बाकी खोटं बोलता येतं हे लक्षात आल्यावर आता मी इतरही बारीकसारीक गोष्टीत खोटं बोलायला लागलो, म्हणजे गंमत म्हणून. आपण खोटं बोललो, बोलू शकतो हा धक्काही कमी व्हायला लागला. त्यातून त्यांच्याशीही मी काही फार गंभीर गोष्टीबद्दल खोटं बोललो नव्हतो. मला पुस्तक वाचायचं होतं म्हणून तर बोललो ना? आता पुस्तक वाचायला आवडण्यात एवढं काय वाईट होतं? पण डोक्यात तो विचार आला आणि त्यातून एक नवा प्रश्नही तयार झाला. एखादी गोष्ट चुकीची हे खरोखर कशामुळे ठरेल ? मुळातच ती गोष्ट बरोबर किंवा चूक असेल, का ती करण्यामागचा हेतू ती चुकीची आहे का नाही ( किंवा असलीच तर किती चुकीची ) हे ठरवेल? अशीच दोनेक वर्ष गेली. मी झाला प्रकार हळूहळू विसरूनही जायला लागलो, आणि सहावीला असताना अचानक मला ती गोष्ट क्लासमधे सांगायची संधी मिळाली. तोवर माझ्या डोक्यातही ती गोष्ट पुसट व्हायला लागली होती. नाही म्हणायला आता रे ब्रॅडबरी मला लेखक म्हणून आवडायला लागला होता आणि त्याची हाताला लागतील ती पुस्तकं मी वाचून काढली होती. चार-पाच तर बाबांच्या कलेक्शनमधे आधीपासूनच होती. पण मला ब्रॅडबरी आवडतोय म्हटल्यावर त्यांनी इतर काही पुस्तकंही आणून दिली. त्यांचा तो आवडता लेखक होताच. गंमत म्हणजे हे करताना त्यांना त्या दिवशी मला काढून दिलेलं पुस्तक अजिबातच लक्षात नव्हतं. मीही त्यांना ती आठवण करून देणार नव्हतो. पण कुठेतरी माझ्या डोक्यात तो दिवस अडकून राहिला होताच. सहावीच्या वर्गामधेही त्या दिवशी इन्स्पेक्शन वगैरे काही नव्हतं. जस्ट आपला रेग्युलर क्लास. पण हिस्ट्री शिकवणाऱ्या मेहता मॅमचा घसा बसला होता, आणि त्यांना अजिबातच बोलता येत नव्हतं. फायनल्सही जवळ आल्याने पोर्शनही संपलेलाच होता. मग मॅमनी आम्हांला फ्री पिरीअड देऊन टाकला. आवाज न करता काहीही करा असं सांगितलं. माझ्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक; मी म्हणालो, “मॅम, मी एक स्टोरी सांगू ?” “स्टोरी ? कसली ?” “अशीच. मी वाचली होती मागे. इन्टरेस्टींग आहे.” एव्हाना बाकीच्यांनी स्टोरी..स्टोरी..स्टोरी.. म्हणून डेस्क्स वाजवायला सुरुवात केली आणि त्यांना गप्प करायला मॅमनी चटकन होही म्हणून टाकलं. समोर उभा राहिलो तेव्हा मी स्वत:शीच इमॅजिन केलं, की क्लासवर कुणीतरी गेस्ट आले आहेत, क्लास इन्स्पेक्ट करायला. समोरचे स्टुडन्ट्स आपसात न बोलता शांत बसले आहेत. आणि हा क्लास सहावीचा नसून चौथीचा आहे. दोन वर्षांपूर्वीचा. वीसेक मिन्टांनी स्टोरी सागून संपली. सगळ्यांनी रीतसर टाळ्याबिळ्या वाजवल्या. मेहता मॅमनाही स्टोरी आवडली. खरं सांगायचं, तर मलाही तिचा शोध नव्यानेच लागल्यासारखा झाला. जुना मित्र पुन्हा भेटावा तसं काहीतरी झालं. त्या संध्याकाळी बाबा साडेसातच्या सुमाराला आले तेव्हा मी त्यांची वाटच बघत होतो. म्हंटलं, “तुम्हांला आठवतय, तुम्ही मला क्लासमधे सांगायला एक स्टोरी सजेस्ट केली होतीत ?” आधी त्यांचा चेहरा ब्लॅन्क झाला. पण मग त्यांना हळूहळू आठवलं. “ब्रॅडबरी, राईट? बट दॅट वॉज अ लॉन्ग टाईम अगो”, ते म्हणाले. “राईट. पण त्या दिवशी मी स्टोरी कशी सांगितली हे विचारलं नाहीत तुम्ही.” ते विचारात पडले. बहुधा हे मी इतक्या दिवसांनी काढतोय याचंही त्यांना आश्चर्यच वाटलं असणार. पण तसं ते बोलले नाहीत. “कशी सांगितलीस?” एवढंच म्हणाले. मग मी बोलतच सुटलो. आमचा वर्ग, इन्स्पेक्शनला आलेले काल्पनिक पाहुणे, मी कशी सुरुवात केली, कसा पिनड्रॉप सायलेन्स होता, मग शेवटी टाळ्या, शाबासकी वगैरे वगैरे. बाबा म्हणाले, “वा ! बरंच लक्षात आहे रे तुझ्या. अगदी आजच झाल्यासारखं. या सगळ्याला दोन वर्षं झाली असं वाटलंच नाही ऐकताना !” मी थोडा चपापलो. पण बाबांना कळण्याची काय शक्यता होती? “हो ना. एकदम फ्रेश आहे डोक्यात. मी तुम्हांला करून दाखवू, कशी सांगितली गोष्ट ते ?” एकदा त्यांनी मला न कळेलसं घड्याळाकडे पाहिलं, पण तरी मला ते कळलंच. मी काहीच बोललो नाही. मग म्हणाले, “हो, दाखव की.” मी लगेच समोर उभा राहिलो आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. बाबांनी हातातला सेलफोन बाजूला ठेवला आणि ऐकायला लागले. आवाज ऐकून आईही हॉलच्या दारात येऊन उभी राहिली. मग बाबांच्या शेजारी सोफ्यावर बसली. गोष्ट छान रंगत गेली. कदाचित वर्गामधे रंगली त्याहून थोडी अधिकच. नंतर मी विचार केला, की दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच. आधी होणार नसलेली गोष्ट होणार आहेच असं सांगितलं, तर नंतर न झालेली ( किंवा निदान मी म्हणालो त्यावेळी न झालेली, आणि जशी होईलसं म्हणालो अगदी तशीही न झालेली) गोष्ट झाली असंही सांगितलं. मग आधी सांगितलेल्या खोट्याचा मला त्रास का झाला, आणि नंतर सांगितलेल्या खोट्याचा का झाला नाही ? कोण जाणे. मला काही याचं उत्तर सांगता नाही येणार. एकच सांगता येईल. की त्या रात्री मला छान झोप लागली. कदाचित दोन वर्षात पहिल्यांदाच.

 • हिरवाईत लपलेली रंगीत दुनिया

  On 24th July 2020, Children Magazine

  पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून!'वयम्' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-

 • रात्री उडणारे ‘पतंग'

  On 21st July 2020, Children Magazine

  दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये 'वयम्' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात 'पतंगां'वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय 'पतंग' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय

 • खमंग सुगंध मातीचा!

  On 17th July 2020, Children Magazine

  गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत.

  पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो.

 • थेंबू आला भेटीला

  On 14th July 2020, Children Magazine

  गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.

  मित्रांनो, मी आलोSSS मी... पावसाचा थेंब!

 • पाठ्यपुस्तकांचा इतिहास!

  On 7th July 2020, Children Magazine

  काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... 'वयम्' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.

  'नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी 'नवं पुस्तक' म्हणजे 'पाठ्यपुस्तक'च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं!

 • ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'

  On 4th July 2020, Children Magazine

  यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. ती वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!' “स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’

 • ‘वयम्’च्या अनुभव लेख उपक्रमावर आधारित शैक्षणिक लेख, आज 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपदकीय पानावर

  On 19th June 2020, Children Magazine

  पाठ घेण्यापेक्षा पाठबळ द्या !

  सध्या मुलांच्या शाळा निदान ऑनलाइन पद्धतीने सुरू व्हाव्या, असा अट्टहासी सूर आळवला जात आहे. करोना-काळात जणू मुलांचे शिक्षण थबकले आहे आणि शिक्षण-विरहित पोकळीत ती जगत आहेत, अशी चिंता काहींना वाटत आहे. खरोखरच अशी स्थिती आहे का? प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी मुलांचे शिकणे बंद पडले आहे का? या काळात अनेक मुलांनी नव्या क्षमता कमावल्या, नवी कौशल्ये आत्मसात केली, त्यांना नव्या जाणिवा झाल्या- ही शक्यता आपण लक्षात का घेत नाही?

  येनकेन प्रकारे शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ मुलांसमोर सादर केले तरच शिक्षण होते, या गृहीतकापलीकडे आपण शिक्षणाचा विचार केला तर नव्या शक्यता लक्षात येऊ शकतात. अगदी पाठ्यपुस्तक या महत्त्वाच्या व मूलभूत शिक्षण-साधनाला प्रमाण मानूनही मुलांना शिकण्यासाठी चालना देण्याच्या अनेक नव्या शक्यता आपण या काळात आजमावू शकतो.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 16

  On 12th June 2020, Children Magazine

  तीव्र संवेदनशीलता

  नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

  आज वाचा भाग- 16.

 • शिस्तशीर मुलांना सलाम!

  On 8th June 2020, Children Magazine

  संयमाची रुजवण

  मुलांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळण्याची सवय बहुतांश घरांतून लागलेली असते. लॉकडाउनमुळे त्यांना जाणीव झाली की, आपल्याला जे जे हवेसे वाटतेय ते आत्ता मिळू शकणार नाही. आहे त्यात समाधान मिळवावे लागेल. कौतुक हे, की मुलांनी हाही धडा आनंदाने आत्मसात केला या काळात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुले लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

  आज वाचा भाग- 15.

 • शिस्तशीर मुलांना सलाम!

  On 2nd June 2020, Children Magazine

  शिस्तशीर मुलांना सलाम!

  “आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत?

  आज वाचा भाग- 14.

 • बेगमीचा काळ !

  On 27th May 2020, Children Magazine

  बेगमीचा काळ !

  करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!!

  …‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

  आज वाचा भाग- 13.

 • घरोघरी छोटे शेफ!

  On 22nd May 2020, Children Magazine

  घरोघरी छोटे शेफ!

  स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय!

  आज वाचा भाग- 12.

 • निवांत काळातील निरीक्षण

  On 20th May 2020, Children Magazine

  एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. आज वाचा भाग- 11.

 • बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन

  On 19th May 2020, Children Magazine

  बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन
  श्री. हेमंत मोने

  शुक्रवार दि. 22 मे 20 रोजी सायंकाळी पश्चिमेकडे बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे एकमेकांजवळ दर्शन होईल. त्या दिवशी संध्याकाळी 7.10 वा. सूर्यास्त होईल.शुक्र खूपच तेजस्वी असल्यामुळे सुर्यास्तानंतर 5—10 मिनिटांतच दिसू लागेल. त्यानंतर 7.35 चे सुमारास संधिप्रकाशाचा प्रभाव कमी होईल आणि मग शुक्राच्या डाव्या हातास (दक्षिणेस ) सुमारे एक अंशावर बुध ग्रह व्यवस्थित दिसेल. या दोन ग्रहांची युती मृग नक्षत्रात होत आहे.मृगातील काक्षी (Betalguse ) हा लाल तारा, सारथी तारका पुंजातील अग्नी (Elnath) व रोहिणी (Aldeberan) यांच्या त्रिकोणात शुक्र आणि बुधाचा मुक्काम असेल.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 10

  On 15th May 2020, Children Magazine

  विस्मृतीतील कलांची ओढ !

  मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

  आज वाचा भाग- 10.

 • तीन ग्रहांचे दर्शन

  On 12th May 2020, Children Magazine

  ‘वयम’ वाचकांनो, पहाटे उठून जरा आकाशात बघा. गुरु, शनी व मंगळ सध्या आपल्याला सहजपणे दर्शन देत आहेत. पहाटे 5 चे सुमारास एकाच वेळी आकाशात तीन ग्रहांचे सुंदर दर्शन होते आहे. त्यासाठी द्विनेत्री, दुर्बिण अशा कोणत्याही साधनाची जरुरी नाही. आपले डोळे त्यासाठी समर्थ आहेत. आता हे ग्रह कसे पहायचे ते सांगतो. पहाटे 5 ते 5.30 ही वेळ सर्वात उत्तम. दक्षीणेकडे तोंड करा. तुमच्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे (पश्चिमेक्डून पूर्वेकडे ) क्रमाने गुरु, शनी व मंगळ यांचे दर्शन होईल. गुरु या तिघांमध्ये तेजस्वी आहे. गुरु—शनी एकाच नजरेत येतात. या दोघांपासून मंगळ डाव्या हातास (पूर्वेकडे) थोडा दूर आहे. मंगळवाऱ दि. 12 ते शनिवार दि.16 पर्यंत निरीक्षण केल्यास आकाश दर्शनाबरोबरच चंद्राचे सरकणेही लक्षात येईल. या काळात ग्रहांच्या स्थितीत लक्षात येण्यासारखा कोणताच बदल होणार नाही. मंगळवाऱ दि. 12 च्या पहाटे चंद्राजवळ गुरु व शनी सहज ओळखता येतील. बुधवार दि. 13 रोजी चंद्र शनीच्या जवळ पोहोचलेला असेल. गुरुवार दि.15 रोजी चंद्र मंगळाला भेटेल. शुक्रवार दि. १६ रोजी चंद्राच्या रेषेत उजवीकडे (पश्चिमेस) अनुक्रमे मंगळ, शनी आणि गुरु यांचे सुरम्य दर्शन होईल.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 8

  On 7th May 2020, Children Magazine

  घरच्या घरी, कित्तीतरी! घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 7

  On 5th May 2020, Children Magazine

  मदत घेण्याची कला!

  अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 6

  On 30th April 2020, Children Magazine

  मुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो... ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5

  On 28th April 2020, Children Magazine

  मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 4

  On 22nd April 2020, Children Magazine

  वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 3

  On 20th April 2020, Children Magazine

  वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 2

  On 14th April 2020, Children Magazine

  करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 1

  On 9th April 2020, Children Magazine

  घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे.

 • शंकू ते मेंदू – आपला रंगप्रवास

  On 12th March 2020, Children Magazine

  इंट्रो - मानवी डोळ्यांना रंग नेमके कसे ओळखता येतात, यावर आतापर्यंत बरीच संशोधने झाली आहेत. काही संशोधने चालू आहेत. त्या संशोधनांतून कितीतरी रंगतदार शोध लागले आहेत... आपल्या जीवनात रंगच नसते, सगळं काही काळं-पांढरं असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं, नाही का ! नशीब, आपल्या सभोवतालीच निसर्गानेच किती रंगांची लयलूट केली आहे. सरत्या पावसाच्या संध्याकाळी आभाळात दिसणारी इंद्रधनूची कमान त्यावरील ता ना पि हि नि पा जा किंवा VIBGYOR आपण आनंदाने पाहू शकतो कारण आपले डोळे आणि त्यांना आज्ञा देणारा मेंदू !

 • नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही!

  On 11th March 2020, Children Magazine

  रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त - रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते.

 • रंगांची बेरीज-वजाबाकी

  On 10th March 2020, Children Magazine

  सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख - “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.

 • अग्नि-उत्सव!

  On 9th March 2020, Children Magazine

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी.

 • प्राण्या तुझा रंग कसा ?

  On 4th March 2020, Children Magazine

  इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का?
  प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात.

 • रंगांची ओळख

  On 3rd March 2020, Children Magazine

  इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.

 • सत्याचा शोध

  On 28th Feb 2020, Children Magazine

  मित्रांनो, आपल्या सार्‍या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.

 • साहित्यातील कोलंबस!

  On 27th Feb 2020, Children Magazine

  ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक

  आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब! कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.