निवडक गुरुपोर्णिमा पत्रे भाग- 3

‘वयम्’ मासिकाने आयोजित केलेल्या ‘गुरुपौर्णिमा पत्रलेखन' स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल ‘वयम्’ मासिकाच्या वेबसाइटवर जाहीर झाला आहे. विजेत्या ३० पैकी काही प्रातिनिधिक पत्रे शेअर करत आहोत. वाचा हा शेवटचा निवडक गुरुपोर्णिमा पत्रे भाग- ३

प्रिय गुरुवर्य श्री निलेश पेडणेकर,

सर, गेली दोन वर्षे मी तुमच्या चिंतामणी संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा मला या विद्यालयाने, पर्यायाने तुम्ही दिली आहे. तुमच्या या वटवृक्षासारख्या विस्तारत जाणाऱ्या विद्यालयाची ख्याती आणि त्याचा विस्तार करण्यासाठी तुम्ही घेतलेले अपार सायास खरोखरच थक्क करणारे आहेत. खरेतर आम्ही तुमच्या करिअरचा आढावा घेण्याइतके मोठे नाही पण मला जर कुणाचा आदर्श घेऊन पुढे जावेसे वाटेल तर ते तुम्हीच आहात सर. अगदी प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही ज्ञानाचे भांडार सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहे. तबला आणि पखवाजसारखी कला एकाच वेळी अनेक मुलांना शिकवणे कसे काय जमत असेल हा प्रश्न अजूनही माझ्यासाठी प्रश्नच आहे. बरेचसे विद्यार्थी तुम्ही उत्तमरीत्या घडवले आहेत. अगदी रात्रीचे दहा वाजेपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. सर, एकाच वेळी चारपाच मुले पखवाज वादन करत असताना कोण चुकतेय हे ओळखण्याची तुमची खासियत तर मला अजूनही कोड्यात पाडते, की कसं काय जमत असेल हे सगळं तुम्हांला! तासनतास समुद्रकिनारी बसून केलेल्या रीयाजातून तुमची मेहनत दिसून येते. तुम्ही एकाच वेळी एकशे आठ पखवाज वादनाचा केलेला कार्यक्रम तर सगळ्यांच्याच लक्षात राहील.

पखवाज वादनाचे धडे मला तुमच्याकडून गिरवायला मिळाले म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते. गुरुपौर्णिमेच्या तुम्हांला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हांला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

कळावे,
तुमची विद्यार्थिनी
समृद्धी वेंगुर्लेकर,
दहावी, न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग

प्रिय निसर्ग,

आज ‘वयम्’ मासिकाच्या पत्रलेखन स्पर्धेमुळे मला तुला पत्र लिहायला मिळत आहे. ‘निसर्गाच्या सान्निध्यात जगायला शिका’ असे म्हटले आहे. माझे घरचे वातावरण निसर्गाचे समतोल साधणारे व पर्यावरणाची जोपासना करणारे आहे.

निसर्गा तुझ्याकडून खूप प्रेरणा मला मिळते. सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी हे तुझेच घटक. ठराविक कालावधीतच दिवस रात्र होते. चंद्रग्रहण-सूर्यग्रहण सारख्या अवकाशातील घटना, पृथ्वीचे परिवलन,परिभ्रमण, ऋतुचक्र यातून मला नेहमी वक्तशीर राहण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा मी मुंग्यांकडे पाहतो, तेव्हा सतत कार्यरत राहण्याची वृत्ती माझ्यात जागृत होते. सुगरणीचा खोपा, पक्ष्यांची घरटी, सुतारपक्ष्याने तयार केलेल्या ढोली बघून माझ्यातील उत्साह खूप वाढतो. प्रत्येक वेळी सतत काम करावे असे मनात येते.

झाडांकडून मी दुसऱ्यांना दान देण्याचा स्वभाव स्वीकारला आहे. स्वत: उन्हात उभे राहून उन्हाने त्रासलेल्या लोकांना शीतल छाया देतो. सतत ऊन, वारा, पाऊस झेलून इतरांसाठी गोड फळे, औषधी वनस्पती, फुले देतो.

निसर्गा, खरंच तू आम्हांला गुरुसमान आहेस. ज्याप्रमाणे परिसाच्या सान्निध्यात लोखंडाचे सोने होते, असे म्हटले जाते, तसेच तुझ्या सान्निध्यात आमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

जेव्हा आपला शिष्य चुकतो, तेव्हा गुरु आपल्या शिष्याला शिक्षा देऊन आपली चूक सुधारतो. जेव्हा जेव्हा आम्ही निसर्गाचा गैरवापर केला तेव्हा तेव्हा तू तुझे चक्रीवादळ, पूर, भूकंप, त्सुनामी यांसारख्या भयानक शिक्षा देऊन तुझे रौद्र रूप दाखवलेस.

निसर्गा, आज मी तुला एक गुरुदक्षिणा देऊ इच्छितो, ती म्हणजे, मी नेहमी निसर्गाचे जतन करेन, नवीन झाडे लावेन. पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे कधीच वागणार नाही. शाळेत शिकवले जाणारे ‘पर्यावरण संवर्धन’ हे मूल्य जोपासेन.

तुझा वरदहस्त समस्त पृथ्वीतलावर कायम असू दे. तू कधीही कोणावर कोपू नकोस. माझ्या बळीराजावर कायम तुझा आशीर्वाद असू दे!!

तुझाच शिष्य,
सार्थ संतोष भोसले
५ वी, शिवाई विद्यालय, प्राथ.मराठी-ठाणे

प्रिय दाबके मॅडम,

स.न.वि.वि.

मॅडम, तुमची एखादा विषय शिकवण्याची पद्धत खूप भावते. एखादा विषय आपल्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गळी उतरविल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसत नाही. केवळ दम दाखवून, भीती दाखवून नाही तर बऱ्याचदा प्रेमाने व मायेने लडीवाळपणे जवळ घेऊन तुम्ही आम्हांला शिकवता. तुम्ही आमच्या वर्गात आम्हांला शिकवत असताना तुमची तासिका कधीच संपू नये असे आम्हां मुलांना वाटत राहते.

तुम्ही आम्हांला सहसा कधी शिक्षा करीत नाही कारण तुम्हीच सांगता की आम्हांला कधी शिक्षा करण्याची वेळ आलीच तर तुम्हांला आमच्यामध्ये तुमची मुले दिसतात.

दाबके मॅडम, आपणास आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून अनेक समृद्ध व ज्ञानसंपन्न विद्यार्थी घडावे अशी आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
कळावे.

आपला आज्ञाधारक,
सोहम बाबू घाडीगावकर
६ वी, सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली

प्रिय तन्मय दादा,

मी चौथी वर्गात असताना कालिका मंदिरात आले होते. त्या मंदिराच्या सभागृहात तुझ्या Jumprope या क्रीडाप्रकाराचा सराव चालू होता तोपर्यंत Jump-rope या खेळाची मला काहीही माहिती नव्हती. आमच्या शाळेतली काही मुले हा खेळ खेळतात एवढेच माहित होते आणि Jump-rope म्हणजे दोरीउडी इतकेच ज्ञान मला होते.

पण तिथला तो तुमचा सराव बघून मी खूपच आकर्षित झाले आणि अगदी मनातून वाटायला लागले की हा खेळ मी कुशलतेने खेळू शकते. तुझे त्या सराव-वर्गातले खेळीमेळीचे वातावरण मला खूपच आवडले. त्या खेळातल्या अगदी लहानसहान गोष्टींचा तू सगळ्या खेळाडूंकडून अगदी काटेकोरपणे सराव करून घेतोस आणि तू आमच्यापेक्षा वयाने काही खूप मोठा नाही ना! त्यामुळे कधी तुझ्या शिस्तीचे दडपणही आले नाही. हळूहळू तुझ्या मार्गदर्शनाखाली मी सराव करत गेले आणि एक खेळाडू म्हणून तयार होऊ लागले.

माझी पहिली स्पर्धा नाशिकचीच. त्यात मी पूर्णत: अपयशी झाले. पण तू मला खूप धीर दिला. माझ्याकडून ज्या चुका झाल्यात, त्यावर अभ्यास करून माझा खूप सराव करून घेतला, आपल्या या मेहनतीच्या जोरावरच मी राजस्थानच्या स्पर्धेत पारितोषिक मिळवू शकले.

दादा, खरोखरच तू मला एक चांगली खेळाडू बनवता बनवता एक चांगली व्यक्ती म्हणून घडवायला मदत करतो आहेस, याबद्दल मी नेहमीच तुझी आभारी असेन.

तुझीच विद्यार्थिनी,
सिद्धी वाणी
8वी, नाशिक

आदरणीय सातपुतेसर,

नमस्कार,

तीन वर्ष झाली नवीन मराठीतून रमणबागेत आलो. मध्ये एकच रस्ता, पण जरा घाबरलोच होतो. अभ्यासापेक्षा मला नाटकातच इंटरेस्ट.

शाळा सुरू होऊन एक महिनाच झाला असेल गोकुळाष्टमीच्या वेळी तुम्ही कृष्णावर नाटक केलत. आणि त्यात मला चक्क पेंद्याचे काम मिळालं. बाबांनी मला जुना गोपाळकृष्ण सिनेमा दाखविला होता, तेव्हा कृष्णाइतकाच ‘माझ्या किसनाची माया लय न्यारी...’ असे म्हणत आनंदाने नाचणारा पेंद्या मला खूप आवडला होता. माझा पेंद्या तुम्हांला किती आवडला ते माहित नाही, पण गेले तीन वर्ष मला दरवर्षी पेंद्या करताना खूप आनंद होत आहे.

रमणबागेच्या नाट्यविभागाबद्दल मोठ्या दादांकडून खूप ऐकलं होतं. नाटकाची प्रॅक्टीस सुरू करण्याच्या आधी किंवा नंतर ते तुम्हांला नमस्कार करायचे तेव्हा त्याचं तुमच्या विषयीचं आणि तुमचं आमच्या सर्वांविषयीचं प्रेम नेहमी दिसायचं, अगदी परवाचच बघा ना! राज्यनाट्यच्या अंतिम फेरीत आपण सगळेजण लातूरहून रात्री उशिरा जवळ-जवळ तीन वाजता पुण्यात आलो. पण तुम्ही पालकांना सावकाश यायला सांगितलं होत. पुण्यात शाळेत पोहोचल्या पोहोचल्या तुमच्या घरून सगळ्यांना कॉफी आली. माझ्या आयुष्यातली पहिली कॉफी मी त्यावेळी प्यायलो त्यामुळे ती कायम लक्षात राहिली. जेवढी काळजी तुम्ही घेता आमची तेवढीच काळजी तुमच्या घरून आलेल्या कॉफीमुळे काकूही घेतात हे कळले.

मला तर कधी एकदा शाळा सुरू होईंल, यापेक्षाही नाटक कधी सुरू होईल, कधी तुमचा शाबासकीचा हात किंवा वेळप्रसंगी धपाटे मिळतील याची वाट बघतोय. नाटकाप्रमाणेच तुमचं तन्मयतेने हिंदी शिकवण आमच्या लक्षात आहे. नाटकाबरोबर हिंदी विषयाची गोडी तुमच्यामुळे लागली.

तुम्हांला नमस्कार. आशीर्वाद मात्र ऑनलाईन नकोत. आपण भेटलो की तुम्ही आशीर्वाद द्यालच, त्या दिवसाची वाट बघतोय.

आपला
सौमित्र मिलिंद सबनीस
८ वी, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे

आदरणीय सतिष पाटील सर.

सप्रेम नमस्कार.

माझे आवडते आदरणीय सतीष पाटील सर,

मला तुमची फार आठवण येते कारण मागच्या वर्षी चौथीच्या वर्गात असताना तुम्ही भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या. जसे की विज्ञान प्रदर्शनमध्ये भाग घेण्याचा आग्रह केला. मला प्रदर्शनात भाग घेण्याची इच्छा नव्हती, मात्र तुम्ही केलेल्या आग्रहामुळे व तुम्ही केलेल्या मदतीमुळे मी सहभागी होऊ शकलो. जेव्हा माझ्याकडून चूक झाली असताना तुम्ही फार धीरगंभीरपणे समजून सांगता. माझ्याकडून चूक व्हायची तेव्हा मला वाटायचे की मला आता मार मिळेल, पण बहुतेकवेळेस तुम्ही समजून सांगायचात. सर, तुम्ही खरोखरच खूप महान आहात. या गोष्टींतून मला खूप काही शिकायला मिळते.

वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याकडे सारखे लक्ष देऊन तुमचं शिकवणं असायचं, जेव्हा आमच्यावर अभ्यासाचा लोड पडायचा तेव्हा तुम्ही गाणे म्हणून आमचे मनोरंजन करायचे. तुमचे गाणे गुणगुणून मी तुमची आठवण करतो.

सर, माझ्या वाढदिवसाला माझ्या घरून मला चॉकलेट मिळाले नव्हते तेव्हा तुम्ही मला २० रुपये देऊन पेढे आणण्यास सांगितले व शिक्षकांना वाटण्यास सांगितले. माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण जो तुमच्यामुळे आला तो मी कधीच विसरणार नाही.

आपला विश्वासू
तन्मय अरुण महाजन
५ वी, श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार

तिर्थरूप आई-बाबा यांस

शि.सा.नमस्कार.

तुम्हांला कधी असं पत्र लिहायची वेळ येईल, असं वाटलंच नव्हतं, पण आज ती वेळ संधी म्हणून आली आहे.

तरीही पत्रास कारण की, आज गुरुपौर्णिमा, गुरु या शब्दाचा विचार केला आणि प्रथमत: तुम्हा दोघांचाच चेहरा डोळ्यासमोर आला; म्हणून सर्वात आधी तुम्हा दोघांनाच गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन! अर्थात प्रत्येकाचे पहिले गुरु हे त्याचे जन्मदातेच असतात.

मनाच्या कोपऱ्यातील आठवणीचे दार अलगद उघडले जाऊन, लहानपणीचे प्रसंग डोळ्यासमोर फेर धरू लागले आहेत. मला ठळकपणे आठवत आहेत ते प्रसंग... लहानपणी कधी चालताना अचानक पडले तर तुम्ही ज्याप्रकारे मला उठवून, हसून परत चालायचं बळ देत होता ते,पावसाळ्यातील माझी गुड्डूम म्हातारीची भीती घालवायची गम्मत, माझ्या आजारपणात तुमची काळजी करणं, मला न चुकता शाळेत पाठवणं, प्रसंगी तुमचं चिडणं, रागावणं व माझं रुसणं.... हे प्रसंग आठवत आहेत ना तुम्हांला? ते आठवून मला आता हसूही येतेय आणि तुमच्या त्या वागण्यामागचं कारण आता कुठे उमजू लागलंय.

आई, मी कधी घाबरले किंवा एखाद्या गोष्टीबद्दल साशंक असले तर मी तुला ते सहज विचारू शकते, मी फार काही न बोलताही तुला सारं काही समजून जातं आणि बाबा, तुम्ही तर मला नेहमीच प्रोत्साहन देत आलाय, जी गोष्ट करायची माझी इच्छा आहे, ती गोष्ट करायला तुम्ही मला कधीच अडवत नाही. तुम्ही मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगता. तुम्ही दोघं नेहमी मला समजून घेता.

मला लहानपणी तुमच्या या वागण्याची गम्मत वाटायची, असं वाटायचं की तुमच्याकडे एखादी दैवी शक्ती, जादू आहे की काय! पण आता उमजतंय ते प्रेम आहे, जे पवित्र आहे, वात्सल्यपूर्ण आहे.
आई, तुझं सर्वांना समजून घेणं, सगळ्यांमध्ये मिळूनमिसळून राहणं, सगळ्यांना आपलंस करणं, तर बाबा तुमचं सगळ्यांना मदत करणं, वक्तृत्वकला आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तम नियोजन या तुमच्या व्यक्तिमत्त्वातून, अनेक प्रसंगांतून मी कळत-नकळत नेहमीच शिकत आली आहे व नेहमीच शिकत राहीन. तुम्ही दोघं माझ्या आयुष्याला, मला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहात म्हणूनच-

‘नास्ति मातृसमी देव: नास्ति तातसमी गुरु:
तयो प्रत्युपकारी हि न कथश्चन विघते
ही काव्यपंक्ती कवीने योजली असेल.
अजून खूप काही बोलायचंय तुमच्यासोबत पण शब्द अपुरे पडत आहेत, तरी शेवटी एवढंच सांगेन की, माझ्यामुळे तुम्हांला कधीही वाईट वाटणार नाही, माझा नेहमी अभिमान वाटेल याची मी काळजी घेईन आणि नक्कीच ही तुमच्यासाठी छोट्टीशी गुरुदक्षिणा असेल. तूर्तास थांबते.
कळावे.

तुमची लाडकी,
तन्वी गणपत चौकेकर
९ वी, शाळा-अ.शि.दे,टोपीवाला हायस्कूल, मालवण

आदरणीय स्मिता राव दीदी,

सा.न.वि.वि.

पत्रास कारण की, आज गुरुपौर्णिमा आहे आणि शाळा बंद असल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही. त्यामुळे पत्र लिहायला घेतले. मला माझे सगळेच शिक्षक आवडतात. पण तुम्ही माझ्या पहिल्या गुरु त्यामुळे तुमच्याबद्दल खूप प्रेम, आदर आणि आठवणी आहेत. ज्या मी कधीच विसरू शकत नाही. बालवाडीच्या तीन वर्षात तुम्ही जे जे शिकवलं, अभ्यासासोबतच ज्या चांगल्या सवयी लावल्या त्या मला नेहमी उपयोगी येतील. आम्ही मुलं कुठे कमी पडतो की, तुम्ही लगेच आईबाबांना बोलावून त्यांच्या कानावर घालायच्या आणि आमच्यात लगेच सुधारणा व्हायची. तुमचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असायचं. आता मी चौथीत गेले तरी तुम्हांला भेटावसं वाटतं. तुमच्याशी बोललं की खूप छान वाटतं. तुम्हीही आठवण आली की मला फोन करता. माझ्या आईशी बोलता. माझ्या अभ्यासाची चौकशी करता, खूप छान वाटतं. माझे आईबाबा सगळ्यांना अभिमानाने सांगतात की स्वरांगीला राव दीदीने घडवलंय.

दीदी शाळेच्या पहिल्या दिवशी खूप भीती वाटत होती. आईबाबा सोडून गेल्यामुळे खूप रडले होते, पण तुमची ओळख झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच शाळेची भीती गेली. तुमच्यामुळे शाळेत येणं आवडू लागलं. सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, त्याची तयारी करणं आणि जिंकण अशी सवयच लागली होती. एखादेवेळी नंबर नाही आला की मी खूप रडायचे. मला वाईट वाटायचे त्यावेळी तुम्ही समजावलं होतं की बेटा नंबर नाही आला तरी चालेल पण स्पर्धेत भाग घ्यायचा आणि आपण प्रयत्न करायचा, मेहनत घ्यायची. दीदी खूप लिहायची इच्छा आहे पण शब्दांची मर्यादा संपत आहे. तुम्हांला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार.

तुमची लाडकी,
-स्वरांगी श्रीरंग कुलकर्णी
४ थी, काशिनय पलोड पब्लिक स्कूल, जळगाव

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !