बहुढंगी अनुभव २०२०

सगळी मुले सध्या घरी आहेत. करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी; शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ५०० मुलांनी त्यांचे अनुभव-लेख पाठवले. त्यात संभ्रम- काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली. सुट्टी असूनही घराच्या बाहेर पडता येणार नाही, मित्रांबरोबरही खेळता येणार नाही- अशा नियमांचे पालन करण्याचा शहाणपणाही मुलांनी दाखवला. या मुलांनी वेगवेगळे अनुभव घेण्याची संधी म्हणून या काळाचा वापर केला. त्यांनी काय काय केले हे त्यांच्याच शब्दांत पण थोडक्यात समोर ठेवणारी १६ भागांची अनुभव-लेख-मालिका आम्ही सोशल मीडियावरून प्रसारित केली. त्यातील काही वानगीदाखल लेख इथे प्रसिद्ध करत आहोत-

 • नर्स आईला प्रेमळ चिठ्ठी!

  साईराज सावंत, हा इयत्ता दुसरीत, गोरेगावच्या डोसीबाई जीजीभॉय या मराठी शाळेत शिकणारा मुलगा. योग्य वेळी आवश्यक तेवढेच बोलणारा, कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा. आपल्या छोट्या भावाबद्दल भरभरून बोलणारा आणि वर्गात सर्वांचा लाडका. त्याची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्सचे काम करते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी साईराजने आईला चिठ्ठी लिहिली. किती तळमळीने लिहिलंय त्याने! त्याच्या शिक्षिकेने ही चिठ्ठी ‘वयम्’ मासिकाकडे पाठवली. प्रिय आई,

  आई तू दवाखान्यामधून आल्यावर काळजी घेत जा. तुझ्या दवाखान्यात करोनाचे पेशंट असतात. तू हात स्वच्छ धूत जा. तोंडाला मास्क वापरत जा. तू देशासाठी चांगलं काम करत आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. आपला देवराज नऊ महिन्यांचा असूनसुद्धा तू कामावर जातेस. पप्पा व मी देवराजची काळजी घेतो. मी अभ्यास पण करतो. तुझ्यासारखे मी पण देशासाठी काम करेन.

  - तुझाच,
  साईराज

 • शांततेतील नव्या जाणिवा

  दहावीचा पोर्शन वेळेतच पूर्ण करण्यासाठी आमच्या शाळेने लॉकडाऊन होण्याआधीच Virtual (Online) Classroom चा पर्याय निवडला. ऑनलाइन लेक्चर, दहावीची आगळीवेगळी सुरुवात! त्यासाठी Zoom Meeting, Google Hangout Meet अशा Appsचा उपयोग करायला मी शिकले. मग या Technologyच्या जगात माझा हार्मोनियमचा आणि चायनीजचा क्लासही मागे राहिला नाही.

  सुरुवातीला सगळेच घरी असल्याने खूप छान वाटत होते. घर आवरणे, नवीन पदार्थ शिकणे, मेंदी काढणे, मी बनवलेला केक कापून आईचा वाढदिवस साजरा करणे अशा गमतीजमती चालू होत्या. पत्ते, कॅरम, सापशिडी अशा अनेक खेळांना बऱ्याच दिवसांनी हवा लागली. बाल्कनीतून दिसणारा निवांत NH 48 पाहून भारी वाटलं. प्रथमच घरबसल्या विविध पक्ष्यांचं कूजन अनुभवता आलं.

  हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आम्ही तिघांनीच घरी गायन-वादनाची मैफल रंगवली. रामनवमीच्या दिवशी आजोळचा रामजन्म सोहळाही ऑनलाइन अनुभवला आणि संध्याकाळी लावलेल्या दिव्यांची तेवणारी ज्योत मनात सकारात्मकता निर्माण करून गेली. आता मात्र शाळेची, मैत्रिणींची ओढ लागली आहे. घरी बसूनही अभ्यास होतोय, परंतु Screen Time वाढल्याने डोळे आणि डोकं दुखायलाही सुरुवात झाली आहे. एरव्ही आवाजातील शांतता शोधणारे आपण आता शांततेतील आवाज ओळखायला शिकतो आहे!

  -सई वैभव जोशी,
  दहावी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

 • नॉलेज, स्किल अप

  तसं बघितलं तर सुट्टी काही मला नवीन नाही, कारण तिसरीनंतर मी दोन वर्षे शाळेमध्ये गेलोच नाही. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी होम स्कूलिंगचा मार्ग पत्करला होता. त्या दोन वर्षांत मी माझ्या आवडीच्या विषयांचा अभ्यास केला- गणित व कॉम्प्युटर. मग २०१९मध्ये सहावीत प्रवेश घेतला आणि मी होमवर्क, वेगवेगळ्या परीक्षा यात अडकलो. दररोज सायकल फिरवायची राहूनच जायचं. आता गच्चीवर रोज सायकल फिरवण्याचा आनंद उपभोगतो. रोज सकाळी केर काढायला, फरशी साफ करून आईला मदत करायला शिकलोय. आमच्या घरी टीव्ही नाही. पण इंटरनेटच्या साह्याने मला वाटेल त्यावेळी मी ‘रामायण’ बघतो. इतिहास विषयसुद्धा असा गोष्टीरूपात शिकवला जावा आणि इतिहास विषयाची परीक्षा नसावी, असं माझं ठाम मत आहे.

  दिल्ली येथील ‘अविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून मी अॅप बनवायचं प्राथमिक ज्ञान मिळवलं. गुगल तसेच MIT या अमेरिकन संस्थांनी MIT APP INVENTOR ही वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घेऊन मी विद्यार्थ्यांना उपयुक्त असं Mathsfriend नावाचं अॅप बनवलं.. गणिताशी निगडित असं हे अॅप आहे. तुम्हीसुद्धा नक्की अॅप बनवायला शिकून घ्या; आणि बरं का, मला तुम्हांला मदत करायला नक्कीच आवडेल.

  सगळ्यांना घरबसल्या संस्कृत शिकता यावे, यासाठी आता मी संस्कृत संभाषण शिकवणारे एक अॅप तयार करणार आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक काजरेकर सर यासाठी आवश्यक ते पाठ उपलब्ध करून देणार आहेत.

  रोबोटिक हासुद्धा माझा आवडता विषय असल्यामुळे त्याच्याशी निगडित विविध वेबसाइटला भेट देऊन त्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न मी करत आहे.

  - -समीहन भूषण पांगम,
  सहावी, डिचोली, गोवा

 • सहवेदना जाणवली

  या सुट्टीमुळे माझ्यातली ‘मी’ शोधण्याची एक संधी मला मिळाली आहे. आधी मी काही विषयांचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मी रोज वेगवेगळे छंद जोपासत आहे. वारली पेंटिंग, रांगोळी, चित्रकला, पेन्सिल शेडिंग, मंडाला आर्ट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे वाचन. त्यात मी ‘वयम्’चे जुने अंक वाचून संपवले. त्यातील शब्दकोडी मी आणि माझ्या बहिणीने मिळून सोडवली. आईसोबत एक तास उपासनेला बसायचे असे ठरवले. त्यातून ऊर्जा मिळाल्याचे जाणवते. ही ऊर्जा मला दुसऱ्या दिवशीच्या उपासनेला खेचून नेते.

  मला लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टी खटकल्या. गावी निघून जाणारे परप्रांतीय बघून आईची मैत्रीण म्हणाली, “बरं झालं, मुंबईची घाण जातेय.” बाहेरून येणारे लोक इथे घाण करतात, असे तिचे म्हणणे मला फार खटकले. मग आई माझ्याशी संवाद साधताना मला म्हणाली की, आपण सारेच नोकरीसाठी मुंबईत आलो आहोत. आपण आपले गावातले तीनहजार स्क्वेअर फुटाचे घर सोडून इथे ७०० स्क्वेअर फूटमध्ये राहत आहोत. कारण आपल्या गावात नोकरी मिळत नाही. मजूरही असेच पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठीच इथे येतात. आज ते करोनाच्या भीतीने गावी जात आहेत. मला असे वाटते की, प्रत्येक माणसाने माणुसकी जपून बोलण्याची खूप गरज आहे. अडचणीत असलेल्यांना कधी असे काही बोलू नये, जमेल तेवढी मदत करावी हे जाणवलं.

  - पर्वणी रडके,
  नववी, दहिसर विद्या मंदिर, मुंबई

 • बार्बीसाठी मास्क!

  आमच्या बाल्कनीत चिमणी, कावळा, कबूतर, सूर्यपक्षी, बुलबुल, पोपट, मुनिया, भारद्वाज असे खूप पक्षी येतात. मी आणि दादा छोट्या दुर्बिणीतून त्यांचं निरीक्षण करतो. त्यांच्या हालचाली पाहतो. त्यांचे आवाज ऐकतो. त्यांना पाणी व खाऊही ठेवला आहे. मी बार्बीशी खूप खेळते. त्यांच्यासाठी मी मास्क आणि ग्लोव्हज् तयार केले आणि खूप सारे ड्रेस शिवले. मी, दादा, आई, बाबा मिळून रोज व्यायाम आणि प्राणायाम करतो. सगळे मिळून स्ट्रॉने मटार उचलणे, हत्तीला शेपूट काढणे, ट्रेझर हंट, जादूचे खेळ, पुस्तक वाचणे अशा अनेक गोष्टी करतो. मी रोज आईला घरकामात मदत पण करते. दादा मला ग्रह आणि तारे यांची माहिती देतो.

  - ओवी चौगुले,
  दुसरी, आनंद निकेतन, नाशिक

 • My Lockdown Experience

  12 th March was an unexpected last academic day of grade 7. To my dismay my due examinations were cancelled.

  There had been a sudden increase in my convergence and determination towards study. I was unable to confine my gladness and felt fortunate enough to have a 15-day holiday prior my examinations; great preparations and contentment were on my way. But the announcement of 21-day lockdown due to ‘COVID-19’ vanished the glory on my face and replaced it with a frown. I had never imagined that such a decision would be taken so haphazardly. That night I came across various nightmares that I wasn’t able to socialize due to social distancing and terribly missing my school. Next morning my mother gave a respite i.e. taught me cooking and then awarding me time for exploring my hobbies. Firstly I was taught Jowar’s Bhakari. After a long time there was a heart-warming experience for me of pouring my thoughts on a paper through sketches. Following days were fantastic too. I learnt to cook chapattis and minor choirs for a meal too. My mother willingly asked me for her reward, so I taught her playing a keyboard and soon ready to teach her guitar. We spontaneously practiced singing some songs together too. I even prepared my own dance routine. I continued painting with my crafty mind.

  There wasn’t any space left for me to complain about being bored as I was so engrossed living my talents.

  Meanwhile our school made a wonderful decision of having Google classroom sessions. This was the actual icing on cake as was desperately missing the school and academics. This was one of the most memorable and valuable experiences I have ever had, sitting in the house itself!

  - -Aniha Sheela Praveen,
  7th, Wisdom High International School, Nashik

 • गरमागरम सामोशांची गम्मत!

  माझी ताई माझ्यासाठी स्कुबी बनवायची. हे स्कुबी बनवणं मला खूप कठीण वाटायचं. ही गुंतागुंतीची कला आहे, असं वाटायचं. पण आता वेळ होता तर मी स्कुबी बनवण्याची कला शिकून घेतली. एक स्कुबी बनवायला किमान तीन दिवस लागले. पण आता ते सुंदर स्कुबी घरात लटकवताना खूप आनंद होतो.
  टीव्हीवर सामोशांची जाहिरात लागते-
  घाला पिठामध्ये तेल... मग कोन बनवा रे..
  हळद, मिरची, मीठ मिसळून.. गरम तेलात तळा रे...
  खरंच मी ते खूप मनावर घेतलं आणि तशीच्या तशी रेसिपी केली. त्या सामोशांमध्ये मीठ खूप घातलं, त्यामुळे सामोसा खूप खारट लागला. आई मला खूप हसली. मला रडायलाच आलं. मग आईने मला मीठ, तिखट प्रमाणात घालायला शिकवलं. तेल गरम झाल्यावर मी सामोसा तेलात टाकला, तर तेल माझ्या तोंडावर उडालं. माझ्या चेहऱ्यावर दोन-तीन फोड आले, पण मी बनवलेला सामोसा खूप स्वादिष्ट होता.

  गच्चीवर कपडे सुकत घालताना मी बाकी सगळ्या कपड्यांची घडी घालायचे, पण साडी तिथेच ठेवायचे. आई मला म्हणाली की, मी तुला साडीची घडी घालायला शिकवते. आता मला साडीची घडी घालता येते.

  या सुट्टीत मी शेडिंग शिकले. चित्र कलर करताना शेडिंग खूप महत्त्वाचं असतं, हे मला बर्वे टीचरने शाळेत शिकवलं होतं. मी यूट्यूबचे व्हिडिओ बघून शेडिंग केलं. हे सर्व अनुभव मला खूप उत्साह आणि आनंद देऊन गेले.

  - वैष्णवी डांगे,
  सहावी, कुमुद विद्यामंदिर, मुंबई

 • करोना फायटिंगच्या कामात छोटीशी मदत!

  मी दिल्लीला राहते. मी या काळात काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या, त्याबद्दल तुम्हांला सांगणार आहे. पहिल्या दोन महिन्यांत माझे तीन दात पडले. ह्या तीन दातांपैकी एक दात तर माझ्या आजीच्या वाढदिवसाला पडला. जेव्हा मी दुसरीत होते, तेव्हा माझ्या मैत्रिणींचे माझ्यापेक्षा जास्त दात पडले होते. आता लॉकडाऊननंतर जेव्हा केव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणी दात पडण्याच्या बाबतीत सेम सेम असू बहुतेक! मी माझ्यासाठी पेन्सिल ठेवण्याचा पाऊच तयार केला. त्यासाठी मी बिस्किटाचा रिकामा खोका घेतला. त्या खोक्याला कोरा कागद चिकटवला. खोक्याच्या उघड्या बाजूला कागद लावला नाही. रिकाम्या बाजूने पेन्सिली ठेवायच्या खोक्यात!

  या काळात अधूनमधून कंटाळा येत असला तरी मी खूशही होते. कारण-आई बाबा घरीच होते आणि माझ्याबरोबर रोज खेळतही होते. आम्ही रोज एकत्र जेवतो. आम्ही एकमेकांना जेवण वाढतो. इथे दिल्लीत खूप गरम होत होतं, तेव्हा जेवताना आम्ही एकमेकांना माठातलं थंडगार पाणी देत होतो. मी स्वयंपाक करायला शिकले. रोज दुपारचा चहा आता मीच करते. भाज्या चिरायला शिकले. माझ्या बाबांनाही वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड आहे. आम्ही दोघांनी मिळून मँगो कुल्फीसुद्धा केली.

  लॉकडाऊनमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हांला सांगते. दिल्लीत ‘आरएमएल’ नावाचं एक मोठ्ठं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधल्या एक डॉक्टर आमच्या कॉलनीत राहतात. या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांसाठी फेस शिल्ड्स आल्या होत्या. पण त्याचे तीन सुटे भाग होते आणि ते एकमेकांशी जोडायचे होते. डॉक्टर किंवा नर्स तर पेशंटना बघण्यात बिझी. मग आमच्या ह्या डॉक्टर मावशींनी विचारलं, कोणी मदत करू शकेल का हे भाग जोडायला? माझ्या आईने त्यांना सांगितलं की आम्ही सगळे करू तुम्हांला मदत. मग काय? चार तासांत आम्ही २०० फेस शिल्ड असेम्बल करून दिले त्यांना! करोनाशी फाइट करण्यात जे जे पुढे आहेत, त्यात आमचाही हा एक छोटासा सहभाग!

  - अमायरा कोलते,
  तिसरी, नवी दिल्ली

 • शिवणकाम, बागकाम शिकलो

  मी कडावल गावात राहतो. आमचं मेडिकल स्टोअर्स व किराणा दुकान आहे. मास्क व सॅनिटायझरसाठी लोकांची गर्दी होऊ लागली. त्याचा तुटवडा होता. मास्क कमी असल्यामुळे आई रात्रीच्या वेळी मास्क शिवायची. मी तिच्याकडून शिवणकाम शिकून घेतले आणि सुती कापडाचे दुहेरी थर असलेले १०० मास्क बनवले.

  शिवाय मी जनजागृतीसाठी विविध बोर्ड बनवले आणि आमच्या दुकानात लावले. माझे हस्ताक्षर खूप खराब आहे, पण मी माझा मित्र जयवर्धन केणी याला कॅलिग्राफी करताना बघितलं होतं. त्याचा थोडाफार उपयोग मला हे बोर्ड बनवताना झाला. घरी वापरण्यासाठी कोरफड व स्पिरीट यापासून सॅनिटायझर बनवला आहे. तसेच मी जादूचे प्रयोगही शिकत आहे.

  आईला व आजीला स्वयंपाक करण्यात मदत करतो. बटाट्याचे अप्पे, फणसाचे वडे, केक असे पदार्थ बनवले. मला शाकाहारी पदार्थ आवडत नाहीत, नॉनव्हेज आवडते. पण करोनाच्या भीतीमुळे मी आता रोज भाज्या खातो, तसेच दुधात हळद घालून गरम गरम दूध पितो.

  सकाळच्या सत्रात मी आमच्या बागेमध्ये झाडे लावणे, झाडांना पाणी घालणे, पाण्यासाठी पाट खणणे अशी विविध कामे करत असतो. नारळाच्या झाडांसाठी अळी केली; आणि हो, मी नारळाच्या झावळ्यांची चटई बनवायला शिकलो. ते काम मी माझ्या बहिणी- युगा व ओवी- यांनाही शिकवले.

  दुपारच्या वेळेत मी आई, बाबा, आजी, काकी, काका यांच्यासोबत विविध गोष्टींवर मुक्तपणे चर्चा करत असतो. एकदा मी सकाळी लवकर उठून दुर्बिणीतून शनी व गुरू या दोन ग्रहांचे निरीक्षण केले. आमच्या युरेका क्लबच्या सर्व मुलांना हे फोटो पाठवले.

  संध्याकाळी आम्ही सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक-विद्यार्थी कॉन्फरन्स कॉलवर एकत्र येऊन प्रार्थना व काही गोष्टींवर चर्चा करतो आणि कोडी सोडवतो.

  - निहार अमोल मुंज,
  आठवी, भडगाव हायस्कूल, जिल्हा- सिंधुदुर्ग

 • चंद्रच माझ्यापाशी!

  या सुट्टीत रोज आम्ही गच्चीवर जाऊ लागलो आणि ही जागा हळूहळू माझ्या आवडीची झाली. टाकीवर चढून उंचावरून सर्वत्र पाहायचं आणि रोज ढगांचे वेगवेगळे आकार, सूर्यकिरणांच्या आणि सूर्यास्ताच्या वेगवेगळ्या छटा यांचा अनुभव घ्यायचा! खूप निवांत वाटलं. एकदा मनात आलं की, आज आपण गच्चीवर झोपावं. मोकळ्या, चांदण्यांनी भरलेल्या आकाशात झोपायला सुरुवातीला छान वाटलं, पण डासांनी आमचा सगळा बेत हाणून पाडला. रात्री दोन वाजता आईला विनवण्या करून आम्ही घरात आलो. सगळे मला खूप हसत होते. खोलीत आल्यावर मी पाहिलं की, चंद्राच्या प्रकाशाचा एक हलकासा झोत माझ्या खिडकीतून खोलीत आला. तो क्षण नजरेत आणि मनात भरून राहिला. मनात आलं, ज्यासाठी एवढा अट्टहास केला, तो चंद्र तर माझ्याच खोलीत आला की! या काळात मला आवडलेली गोष्ट, म्हणजे माझी आई सतत माझ्यासोबत घरात होती. एरव्ही ती ऑफिसातून लवकर घरी यावी यासाठी मला हट्ट करावा लागतो.

  अलीकडे मी छान पोळ्या करायला शिकले. दादाची व माझी मऊ पोळ्या करण्याची स्पर्धा सुरू झाली. शिवाय मला कविता करण्याचं वेड लागलं. मनाप्रमाणे कविता सुचल्याने मला प्रसन्न वाटलं. एकदा भिंती घासूनपुसून स्वच्छ केल्या. पुस्तक वाचलं. वेगवेगळी गाणी ऐकली. जुन्या कपड्यांपासून पायपुसणं शिवलं. रोज मला मी वेगवेगळ्या रूपांत, वेगळ्या गोष्टींत सापडू लागले...

  - संस्कृती शिंदे,
  दहावी, आनंद निकेतन, नाशिक

 • वाचनात रममाण

  सुट्टीच्या पहिल्या दिवशीच अतुल देऊळगावकर यांचं ‘ग्रेटाची हाक’ हे पुस्तक हातात घेतलं आणि बघता बघता संपवलंसुद्धा! ‘ग्रेटाची हाक’ पुस्तक वाचताना मी किती वेळेस तरी आईजवळ रडले. मग आईने सांगितलं की, तुला जे वाटतं ते लिहून काढ; आणि वहीवर लिहून काढलं. ते आईच्या मदतीने देऊळगावकर सरांना इ-मेलने पाठवलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि एक-दोन वेळा फोनसुद्धा आला. आभाळ ठेंगणं झालं होतं! आई म्हणाली, “बाळा, एवढ्याने हरखून जाऊ नकोस आणि इथे थांबूही नकोस.” मग माझी गाडी पुन्हा वाचनावर आली. ‘द डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे पुस्तक घेतलं. त्या पुस्तकातून मी काय शिकले हे शब्दांत मांडू शकत नाही.

  दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा झालेला अमानुष छळ वाचून खूप म्हणजे खूप वाईट वाटलं.

  यानंतर मी ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हे पुस्तक वाचलं. हे तर माझ्या खूप आवडत्या लेखिकेचं पुस्तक! सुधा मूर्ती यांनी त्या पुस्तकात खऱ्या घडलेल्या २० गोष्टी लिहिल्या आहेत. धनंजय कीर यांचं ‘महात्मा फुले’ हे चरित्रही मी वाचलं. महात्मा फुले यांच्याकडून मी महत्त्वाच्या चार गोष्टी शिकले-

  १. संयम, जो माझ्याकडे बिलकूलच नव्हता.
  २. प्रयत्न करत राहिले पाहिजे.
  ३. दृष्टिकोन कसा असावा आणि;
  ४. सत्य हाच ईश्वर मानणे.

  आणखी एक उपक्रम मी केला. सर्व नातेवाइकांच्या नावाच्या चिठ्ठ्या केल्या. आणि रोज एका नातेवाइकाची चिठ्ठी काढून त्यांना मी पत्र लिहिलं. खरं तर फोनमुळे पत्र लिहिण्याची सवय नाही. परंतु या उपक्रमामुळे माझ्या त्या व्यक्तीविषयीच्या भावना, आपुलकी, प्रेम ह्या गोष्टी मला त्या पत्रामधून व्यक्त करता आल्या.

  आमच्या घराच्या बाजूला एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राऊंडमध्ये ३५ ते ४० कुटुंबं अडकली आहेत, जी रस्त्यावर काही ना काही वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. माझ्या पप्पांनी व त्यांच्या मित्रांनी मिळून त्या लोकांना एका महिन्याचं किराणा सामान दिलं. या दरम्यान पप्पांनी केलेली धडपड मला खूप जवळून पाहायला मिळाली.

  - समृद्धी अजय महाजन,
  आठवी, गांधी विद्यालय, परभणी