‘वयम्’ मासिकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाइन शाळा- माझा अनुभव’ लेख-स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून सुमारे २५० मुलांनी त्यांचे अनुभव लिहून पाठवले. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मुलांनी त्यांचे अनुभव लिहिले. या स्पर्धेचे परिक्षण केले नागपूरच्या पत्रकार, लेखिका सोनाली कोलारकर-सोनार, मुंबईच्या शिक्षिका, लेखिका कांचन जोशी, ‘वयम्’ मासिकाच्या संपादक शुभदा चौकर आणि उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील यांनी. ‘वयम्’ मासिकाच्या प्रथेप्रमाणे क्रमांक न देता उत्तम १५ अनुभव-लेखकांना ‘विजेते’ घोषित करण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व सहभागींचे कौतुक.

परीक्षकांची निरीक्षणे-

सर्व मुलांनी प्रामाणिकपणे मत मांडले आहे. बऱ्याच मुलांना ऑनलाइन शाळा खूपच भावलीय तर काहींना ही पद्धत फारशी रुचलेली नाही. मात्र बहुतांश मुलांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या शाळेची सतत आठवण येत आहे.

काही मुद्दे सारांश रूपात :

 • सहभागींपैकी ऑनलाइन शाळा न आवडणाऱ्या मुलांचे प्रमाण फारसे नाही.
 • मुलांना हा बदल आवडला आहे. पण शाळेला देखील ते अनेक कारणांनी ‘मिस’ करताहेत.
 • दुसरी ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थोड्या वेळासाठी खेळायला, मित्रांच्या गाठीभेटीसाठी, एकत्र डबे खायला आणि विशेषतः आपल्या शिक्षकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला प्रत्यक्ष शाळाच हवीहवीशी वाटतेय.
 • पीटी, खेळाचा तास, मित्रमंडळ, सर्वांगीण विकासासाठी होणारे शालेय उपक्रम या गोष्टींसाठी शाळा हवीच, असे मुलांना वाटतेय.
 • पालकांसोबत राहायला, शिकायला मिळते आहे, हा अनुभव मुलांना खूप आवडला आहे.
 • 7 वी ते 10 वी च्या मुलांना ऑनलाइन शिक्षण जास्त फायदेशीर वाटते आहे, कारण त्यांना स्वतःचा अभ्यास करायला व छंद-आवडी जपायलाही वेळ मिळतोय.
 • लांबच्या शाळेत जाण्यायेण्याचा त्रास कमी झाल्याचे अनेक मुलांनी नमूद केले आहे.
 • सगळे शिक्षक ऑनलाइन शिकवताना प्रेमाने बोलतात. "तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, झोपला होता का समजावत होते तेव्हा.. " असे काहीही आता म्हणत नाहीत, त्यामुळे खूप छान वाटते, अशी प्रतिक्रिया अनेक मुलांनी दिली आहे.
 • शिक्षक जास्त तयारीने आणि नवनवीन प्रयोग करून, शिकवण्याच्या आधुनिक पद्धती वापरून शिकवण्याचा प्रयत्न करताहेत, हे मुलांनी हेरले आहे. काही शाळांमध्ये कल्पक, तळमळीने शिकवणारे शिक्षक आहेत, त्या शाळांची मुले तिथे ऑनलाइन शिक्षणाबाबत समाधानी आहेत. कळकळीने शिकवणाऱ्या शिक्षकांचे मुलांनी मनापासून आभार मानले आहेत.
 • ऑनलाईन शाळेमध्येसुद्धा काही शिक्षक वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत, त्याचीही गम्मत मुलांना वाटते आहे.
 • काहींनी मात्र म्हटले आहे की, ऑनलाइन शाळेत प्रश्न विचारता येत नाहीत, चर्चा करता येत नाही, त्यामुळे शंकानिरसन होत नाही. प्रत्यक्ष शाळेत जेवढे विस्ताराने आणि समजावून शिकवत होते, तसे यात नाही.
 • शिक्षक-विद्यार्थ्यांमधला संवाद थांबून त्याला भाषणाचे रूप आले आहे, ते आवडत नाही, असेही काही मुलांनी म्हटले आहे.
 • वर्गात शिकताना एखाद्या प्रश्नावरून वेगवेगळे विषय निघायचे आणि अवांतर माहिती खूप मिळायची, ती प्रक्रिया आता बंद झाली आहे, हे ही निरीक्षण मुलांनी नोंदवले आहे.
 • शाळेत शिक्षक विनाकारण शिक्षा करतात, ओरडतात, तुलना करतात अशा काही गोष्टींमुळे जो ताण येतो, तो आता येत नाही.
 • काही शिक्षक मात्र ऑनलाइन शिकवतानाही धाक दाखवतात, गणवेश घातला नाही तर ओरडतात, टोचून बोलतात, मोठा गृहपाठ देतात, हे अनावश्यक प्रकारही सुरू असल्याचे मुलांच्या लेखनातून जाणवत आहे.
 • वर्गात खोड्या करणाऱ्या मुलांमुळे जो त्रास व्हायचा तो आता होत नाही, त्यामुळे शिकवायला शिक्षकांना अधिक वेळ मिळतो, असेही मुलांचे निरीक्षण आहे.
 • नेटवर्कची समस्या, त्यामुळे अडथळे.. ही सगळ्यात मोठी समस्या आहे, हे तर बहुतांश मुलांनी नमूद केले आहे. एकाच जागी बसून सतत स्क्रीनकडे बघत अभ्यास करायची सवय नसल्याने सतत स्क्रीन बघणे कंटाळवाणे वाटते, असेही काही मुले म्हणतात.
 • दिशा app आणि टिली-मिली कार्यक्रम उपयुक असल्याचे देखील अनेकांनी नमूद केले आहे. या app मुळे राज्यभरातील सगळ्या मुलांना उत्तम शिक्षकांमार्फत शिकायला मिळते आहे आणि याचा खूप फायदा झाला आहे.
 • पुस्तकातील QR कोडमध्ये काहीवेळा चुकीची माहितीही आढळते, त्यामुळे नक्की बरोबर काय, असा प्रश्नही निर्माण होतो, असे काहींनी म्हटले आहे.
 • अनेक विद्यार्थ्यांनी technology लवकर आत्मसात केली. शिक्षकांना मात्र तंत्रज्ञानाशी जुळवून घाययाला वेळ लागतोय. त्यांना ऑनलाइनमध्ये प्रभावी शिकवण्यासाठी मार्गदर्शन मिळाले पाहिजे, असे मत काही मुलांनी नोंदवले आहे. पुढे जाऊन काही मुलांनी म्हटले आहे की, शिक्षकांना ते तंत्र छान वापरता आले तर, ऑनलाइन शिकवतानाही मुलांच्या खोड्या बंद करणे शिक्षकांना सोपे जाईल आणि गांभीर्याने शिक्षण होईल.
 • ग्रामीण भागातील मुलांचे रोज ऑनलाइन तास नसतात. अशा ठिकाणी you tube वरील तज्ज्ञ शिक्षकांचे व्हिडीओ ग्रुपवर पाठवले जातात॰ त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांकडून विषय शिकायला मिळतात आणि हे मुलांना आवडत आहे.
 • ऑनलाइन शाळेतील परीक्षा घरून होत असल्याने काही मुले बघून उत्तरे लिहितात. अशाने खरी मेहनत करणाऱ्यांवर अन्याय होतोय, असेही काही मुले म्हणताहेत.
 • कायम रोज 6-7 तासांची शाळा कशाला हवी, हा प्रश्न या निमित्ताने अनेक मुलांना पडला आहे.
 • करोना-काळ संपला की प्रत्यक्ष शाळा आणि ऑनलाइन शिक्षण यांचा समन्वय साधला जावा, असे अनेक मुलांना वाटत आहे.

विजेते आहेत-

 • १. प्रियल राजेश राऊत, सहावी, आदर्श विद्या मंदिर, केळवे, पालघर, मुंबई
 • २. जयदीप यशवंत मिसाळ, आठवी, जिजामाता पब्लिक स्कूल, भेन्दा, अहमदनगर
 • ३. उर्वी श्रीपाद जोशी, आठवी, महात्मा गांधी विद्या मंदिर, बांद्रा, मुंबई
 • ४. समृद्धी अजय महाजन, नववी, गांधी विद्यालय, परभणी
 • ५. मुक्ता शलाका राहुल वारंगे, आठवी, को. ए. सो. कै. सौ. पा. म. थरवळ कन्या विद्यालय, महाड, रायगड
 • ६. पूर्वा चंद्रशेखर दरणे, पाचवी, जि. प. शाळा सुकळ, प. स. कळंब, जि. यवतमाळ
 • ७. सोहम विनय कुलकर्णी, नववी, विद्या प्रबोधिनी प्रशाला, मराठी माध्यम, नाशिक
 • ८. समर्थ वसंतराव भिसे, पाचवी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर
 • ९. उर्वी संगीता हेमंत खडके, दहावी, श्री समर्थ विद्यालय, अमरावती
 • १०. इशत समिर फडके, चौथी, जि.प.प्रा.मुलांची शाळा, जवळा, ता.सांगोला
 • ११. स्वराज संतोष होडे, दुसरी, न्यू इंग्लिश स्कूल, हडपसर, पुणे
 • १२. सृष्टी संजय केंद्रे, दहावी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर
 • १३. अस्मी अमित साळवी, चौथी, केंद्र शाळा फणसोफ- मराठी, ता. जिल्हा- रत्नागिरी
 • १४. प्रतिक्षा सुहास रावराणे, दहावी, अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी, सिंधुदुर्ग
 • १५. अनन्या शिवानंद तोंडे, सातवी, आनंद निकेतन, नाशिक

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !